बेलापूरसाठी सुटलेली गाडी वांद्रे स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ

मुंबई : मध्य रेल्वेने नजीकच्या काळात घडलेल्या चुकांचा सोमवारी रात्री कळस गाठला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून सोमवारी रात्री नऊ वाजून ४० मिनिटांनी बेलापूरसाठी सुटलेली लोकल वडाळ्याला आली. तेथून पुढे गुरूतेग बहाद्दूर नगर येथे जाण्याऐवजी ती भरकटली आणि वांद्रे स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

काही अंतर कापल्यानंतर ही चूक मोटरमन, गार्ड यांच्या लक्षात आली. तर प्रवासीही अचंबित झाले. पुढे चूक सुधारण्यासाठी ही लोकल आधी किंग्ज सर्कल स्थानकावर नेण्यात आली. तेथे प्रवाशांची माफी मागून ती रदद केली गेली आणि पुढे वांद्रे स्थानकात नेण्यात आली. या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. वडाळा स्थानकात चुकीचा सिग्नल मिळाल्याने ही लोकल भरकटल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. गेल्याच आठवडय़ात सीएसएमटीहून सुटलेल्या जलद लोकलने सिग्नल मोडून भायखळा स्थानक गाठले होते.