मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून तब्बल चार वर्षे लोटली. निविदा काढून दोन वर्षे झाली मात्र अद्यापि कामासाठी एजन्सी नेमण्याचा मुहूर्त न निघाल्यामुळे रुग्णालयात यंदा जागोजागी गळती होण्याची भीती येथील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. येथील निवासी डॉक्टरांच्या राहण्यासाठी तीन बहुमजली इमारती बांधण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला असला तरी अद्यापि साध्या निविदाही काढण्यात आलेल्या नाहीत. दरम्यान ‘लोकसत्ता’ने अपघात विभागाच्या इमारतीच्या धोकादायक अवस्थेला वाचा फोडल्यानंतर महापौर व सभागृहनेत्यांनी तातडीने भेट देऊन चौकशीची मागणी केली आहे.

शीव रुग्णालयात सुमारे तीन हजार खाटा असून येथे वर्षांकाठी जवळपास २० लाख रुग्ण ‘बाह्यरुग्ण विभागात’ उपचारासाठी येतात तर ८५ हजार रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. सुमारे ९० हजार शस्त्रक्रिया होणाऱ्या या रुग्णालयाची मुख्य इमारत जुनी झाली असून त्याचीही  दुरुस्ती होणे आवश्यक आहे. यासाठी तत्कालीन अधिष्ठात्यांनी रुग्णालय दुरुस्तीचा प्रस्ताव पालिका प्रशासनाला सादर केला होता. त्यानुसार पालिकेच्या ‘रुग्णालय पायाभूत सुविधा कक्ष’ने दोन वर्षांपूर्वी निविदाही काढल्या. तथापि अद्यापि या कामासाठी एजन्सीच नेमण्यात आली नसल्याची  बाब उघडकीस आली आहे. रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय नव्याने बांधण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घोण्यात आल्याने रुग्णालयाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गेल्या मार्चमध्ये नवीन रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले होते. तथापि अद्यापि या नवीन रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचे अंतिम आराखडेही तयार नसल्याचे ‘रुग्णालय पायाभूत सुविधा कक्ष’चे उपायुक्त सुनील धामणे यांनी सांगितले. येथील निवासी डॉक्टरांसाठी तीन बहुमजली हॉस्टेल बांधण्याचा निर्णयही दोन वर्षांपूर्वी घेण्यात आला होता. त्याच्याही निविदा  काढण्यात आल्या नसल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

येथील अपघात व बाह्यरुग्ण विभागाची इमारत सत्तरच्या दशकातील असून त्याच्या दुरुस्तीचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले असले तरी  पूर्ण होऊ शकले नाही. त्याचा फटका येथील हृदयविकार विभागासह रक्तपेढीला बसला आहे, याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी,  महापौर विश्वनाथ महाडेश्वार व सभागृह नेते यशवंत जाधव यांना रुग्णालयात जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी हृदयविकार विभागासह अपघात विभागाची पाहणी करून युद्धपातळीवर काम करण्याचे तसेच दिरंगाईच्या चौकशीचे आदेश दिले. उपायुक्त धामणे यांनी या दिरंगाईप्रकरणी व कामाच्या दर्जाची दक्षता विभागाच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, असे सांगितले.

रक्तपेढीत १४ टेकू

येथील रक्तपेढी तब्बल १४ टेकूवर उभी आहे. येथे काम करणारे कर्मचारी व डॉक्टर जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. हृदयविकार विभाग हा टेकूंचा विभाग बनला आहे.

येत्या दोन-तीन दिवसांत मी स्वत: शीव रुग्णालयात जाऊन अपघात विभागाच्या इमारतीची तसेच हृदयविकार विभागाची पाहणी करणार आहे. तसेच रुग्णालाच्या दुरुस्तीसह नवीन रुग्णालय उभारणीच्या कामांसंदर्भात आयुक्तांशी बोलेन. पालिका रुग्णालयाच्या कामाला निधीची कमतरता कोणत्याही परिस्थितीत पडू देणार नाही. तसेच रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळतील यासाठी प्रयत्न केले जातील. – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख