‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ कार्यक्रमात रविवारी वसईमध्ये सखोल चर्चा

घर, कार्यालय यासंबंधी जबाबदाऱ्या निभावताना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची होणारी हेळसांड लक्षात येत असली तरी वेळेच्या चक्रापुढे आपण सगळेच हतबल असतो. या बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम वेळीच ओळखून निरोगी आणि तणावरहित जीवन कसे जगायचे हे सांगण्याकरिता ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ उपनगरवासीयांच्या भेटीसाठी येत आहे. वसई येथे रविवार, २४ नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी आहार, योग आणि आयुर्वेद क्षेत्रातील वक्ते उपस्थितांशी यावेळी संवाद साधणार आहेत.

मानवी शरीराला जडलेल्या अनेक आजारांचे मूळ हे आधुनिक जीवनशैलीत दडलेले आहे. व्यायाम हा धावपळीच्या आयुष्यात हरवला असून आहाराचे गणितही बिघडले आहे. याचे दुष्परिणाम शरीरावर होत आहेतच, परंतु मनावरील नियंत्रणही हळूहळू ढासळू लागले आहे. यावरील अनेक उपायांची चर्चा सध्या घडत आहे. मात्र यातील नेमके विश्वासार्ह उपाय कोणते, औषधोपचार कसा निवडावा, आहाराचे नियोजन याविषयी सखोल चर्चा आणि मार्गदर्शन वाचकांपर्यंत ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या चर्चासत्रातून घेऊन येत आहे. ‘घरच्या घरी पौष्टिक आहार’ या विषयावर आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अरुणा टिळक माहिती देतील, तर योग आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. आशिष फडके ‘योग आणि आयुर्वेद’ या सत्रामध्ये ताणाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करतील.

कुठे?- रविवार, २४ नोव्हेंबर

कधी?- विश्वकर्मा हॉल, वीर सावरकर नगर, आनंदनगर, वसई (प.)

वेळ -सायंकाळी ६ वाजता