scorecardresearch

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मधून करिअरमंत्र

दहावी-बारावीनंतरच्या मार्गदर्शनासाठी ठाण्यात कार्यशाळा

loksatta-marg-yashacha
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दहावी-बारावीनंतरच्या मार्गदर्शनासाठी ठाण्यात कार्यशाळा

दहावी आणि बारावी म्हणजे करिअरचा उंबरठाच. इथे योग्य पाऊल पडले तर पुढची वाटचाल सुकर होणार. म्हणूनच या टप्प्यावर गरज भासते ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची. याचसाठी लोकसत्ता मार्ग यशाचा ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार १९ आणि शनिवार २० मे रोजी ठाण्यातील टिपटॉप प्लाझा इथे हा कार्यक्रम होणार आहे. वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञ या वेळी मार्गदर्शन करतील.

विद्यार्थिदशेत असताना परीक्षा अपरिहार्य असते. पण अभ्यासातील नावड, नापास होणे, यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना नैराश्य येते. त्या वेळी नेमके काय करावे, परीक्षेतील यशापयशाचा डाव न हरता कसा मांडावा, याविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ राजेंद्र बर्वे मार्गदर्शन करतील. दहावीनंतर करिअर घडवायचे म्हणजे नेमके काय करायचे? आपल्या आवडीची वाट कशी निवडावी, याविषयी प्रसिद्ध करिअर समुपदेशक विवेक वेलणकर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. दहावी, बारावीनंतरच्या संधी तसेच उच्चशिक्षणाच्या वाटा याबद्दलही ते विशेष मार्गदर्शन करतील.

वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी गरजेची असलेली ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा, तसेच अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘जेईई’ ही परीक्षा द्यावी लागते. पण या परीक्षांची योग्य माहिती नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्याचा एक बागुलबुवा तयार झाला आहे. या परीक्षांमध्ये कसे यश मिळवावे, त्यासाठी अभ्यासाच्या युक्त्या आणि क्लृप्त्या सांगतील, या विषयातील तज्ज्ञ शिक्षक. प्रा. किशोर चव्हाण, डॉ. विकास गोलतकर, समीर राणे, प्रसन्न पंडित.

नेहमीच्या करिअरपल्याड असलेल्या वेगळ्या वाटांविषयीही विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले जाईल. डिजिटल मीडिया हा आजच्या जगातला परवलीचा शब्द झालाय. पण त्यात करिअर कसे घडवायचे याविषयी डिजिटल मीडिया तज्ज्ञ मिहीर करकरे माहिती देतील. मिहीर स्वत: या क्षेत्रातील एक कंपनी चालवत असल्याने त्यांचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी नक्कीच महत्त्वाचा ठरेल. तर खेळाडू असण्यापलीकडेही खेळामध्ये करिअरला कसा वाव आहे? याविषयी नीता ताटके आणि वर्षां उपाध्ये या क्रीडा तज्ज्ञ माहिती देतील. जाहिरात क्षेत्रातील एका नामवंत कंपनीमध्ये उच्चपदावर काम करणारे अभिजित करंदीकर जाहिरात विश्वातले करिअर उलगडून दाखवतील. तसेच आवाज आणि त्याच्याशी संबंधित करिअरची गंमत सांगतील सुप्रसिद्घ आर जे रश्मी वारंग. दोन्ही दिवस सारखेच विषय आणि वक्ते असतील. या करिअर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.

untitled-14

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-05-2017 at 02:24 IST