अर्थव्यवस्थेचे दालन खुले झाल्यानंतर आपल्याकडे गेल्या दोन दशकांत खूप काही बदलले. त्यात अगदी प्रसिद्धी माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिकीकरणापासून ट्विटरच्या टिवटिवीपर्यंतचा समावेश करता येईल. माध्यमांचा चेहरामोहरा बदलताना वृत्तपत्रे तरी त्यात कशी मागे राहतील. अमुक एका वारी रंगीत पाने, पुरवणी रंगीत, संपूर्ण दैनिकच रंगीत वगैरे बदल झाले, पुढे इंटरनेट आवृत्या, अँड्रॉइड अॅप्स इत्यादीही आले. ‘लोकसत्ता’ही या बदलांत अपवाद राहिलेला नाही. मात्र, चेहरामोहरा बदलला तरी सामाजिक बांधिलकीचे भान ‘लोकसत्ता’ने कायमच बाळगले. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हे त्याचे उत्तम उदाहरण. या उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष.
उपेक्षित, दुर्लक्षित गटांत मोडणाऱ्या समाजवर्गाचं दु:खं समजावून घेऊन त्यांच्यात बदल घडवणाऱ्या, त्यांना मदतीचा हात देणाऱ्या, त्यासाठी अहोरात्र खस्ता खाणाऱ्या संस्थांची ओळख करून देत त्यांच्या कार्याला आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणारा हा उपक्रम. नांदेडमधील नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेले अभ्यासकेंद्र, निराधारांना आधार देणारा नाशिकमधील आधाराश्रम, कर्करुग्णांना मदत करणारी मुंबईतील कॅन्सर पेशंट एड असोसिएशन, मुक्या प्राण्यांना जीवदान देणारी अहिंसा, अंध विद्यार्थ्यांसाठी झटणारी कोकणातील स्नेहज्योती संस्था, विज्ञानाची कास धरायला शिकवून स्वावलंबी बनवणारा पाबळचा विज्ञान आश्रम यासह दहा संस्थांच्या कार्याचा परिचय ‘सर्वकार्येषु उपक्रमा’च्या माध्यमातून यंदा करून देण्यात आला. त्यास सालाबादप्रमाणे यंदाही प्रचंड प्रतिसाद लाभला. या दानरुपी यज्ञात ‘लोकसत्ता’च्या हजारो वाचकांनी अक्षरश: लाखो रुपयांच्या समिधा अर्पित केल्या. त्यायोगे सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. संस्थात्मक पातळीवर समाजोपयोगी कार्यासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर निधी जमा होणे हे विरळाच. आता वेळ आहे पूर्णाहुतीची, वाचकांनी आमच्याकडे जमा केलेले धनादेश त्या-त्या संस्थांकडे सुपूर्द करण्याची. अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते या संस्थांच्या प्रतिनिधींना हे धनादेश बुधवारी, २९ ऑक्टोबर रोजी सुपूर्द करण्यात येतील.