scorecardresearch

‘हिंदूस्तानी’ हीच भारतीयांची भाषा ; गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन

अख्तर यांचे वडील जाँ निसार अख्तर यांनी संपादित केलेल्या ‘हिंदोस्तां हमारा’ या पुस्तकाच्या २५ वर्षांनी आलेल्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी झाले.

Javed-Akhtar
(फोटो – संग्रहित)

मुंबई : आजकाल सर्वसामान्य भारतीय एकमेकांशी बोलण्यासाठी जी भाषा वापरतात, ती हिंदी किंवा उर्दू भाषा नाही, तर हिंदूस्थानी भाषा आहे आणि तीच हिंदूस्थानची भाषा आहे. या भाषेने इतर भाषांमधले, इतर प्रांतातले इतकेच काय, पण परदेशी भाषेतील शब्दही आपलेसे केले आहेत आणि ते कुणाला खटकत नाहीत. उलट सहजगत्या आल्यासारखे वाटतात, असे मत प्रसिद्ध गीतकार आणि साहित्यिक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले. वरळीच्या नेहरू केंद्रामध्ये ‘किताब उत्सव’ हा हिंदी साहित्यावर आधारित सोहळा सुरू आहे.

राजकमल प्रकाशन संस्थेतर्फे आयोजित साहित्य सोहळय़ात पाच दिवसांपासून हिंदी-मराठी साहित्यातील मान्यवरांनी संगीत, साहित्य, नाटक, सिनेमा, संस्कृती या विषयाशी संबंधित चर्चासत्रांत सहभाग नोंदविला. गुरुवारी या कार्यक्रमाला गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थिती लावली. अख्तर यांचे वडील जाँ निसार अख्तर यांनी संपादित केलेल्या ‘हिंदूोस्ता हमारा’ या पुस्तकाच्या २५ वर्षांनी आलेल्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी झाले. यावेळी अतुल तिवारी यांनी जावेद अख्तर यांची मुलाखत घेतली. यात मनमोकळय़ा गप्पांमधून उर्दू, हिंदी व हिंदूस्थानी भाषेचे सौंदर्य व नजाकत अख्तर यांनी उलगडून दाखवली. त्याचबरोबर सगळय़ाच मातृभाषा आता मरणपंथाला लागल्या असल्याबद्दल खंतही व्यक्त केली. एखादा शुद्ध हिंदी बोलणारा भेटलाच तर हा कुठल्या गावातून किंवा गरीब घरातून आला आहे की काय असा बघणाऱ्याचा दृष्टीकोन असतो, असे सांगत अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली. एका चित्रपटासाठी कृष्णाची आरती लिहायची होती. संगीतकार मला सांगताना थोडे बिचकत होते. पण मी ते गीत लिहिले, कृष्णाची असंख्य नावे त्यात पेरल्याची आठवण त्यांनी सांगितली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 03:44 IST

संबंधित बातम्या