राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २२ ते २५ नोव्हेंबरदरम्यान होणार असून आता कोणाची मंत्रीपदी वर्णी लागणार, याची चर्चा सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठीही चाचपणी सुरु असून काही नेत्यांना मंत्रिमंडळात तर काहींना पक्षसंघटनेत स्थान दिले जाणार आहे.
विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर आता मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयारी सुरु केली आहे. मंत्रिमंडळाचा आकार लहान ठेवण्यात येणार असून प्रत्येक विभागाला प्रतिनिधीत्व देतानाच सर्व जातीधर्माच्या नेत्यांना स्थान देण्याचा प्रयत्न आहे. फडणवीस आता मुख्यमंत्री झाल्याने त्यांना पक्षासाठी वेळ देता येणे शक्य नाही. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षांचे नाव ठरविण्यात आल्यावर ते राजीनामा देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरुन आल्यावर फडणवीस नवी दिल्लीला जाऊन त्यांच्याशी व अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. त्यावेळी मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे आणि प्रदेशाध्यक्षांची जबाबदारी कोणावर सोपवायची, याचा निर्णय होईल.
भाजपबरोबर असलेल्या चारही घटकपक्षांना मंत्रिमंडळात कसे स्थान द्यायचे, त्यांच्या ज्या नेत्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे आहे आणि ते विधिमंडळाचे सदस्य नसतील तर त्यांची जबाबदारी भाजपने घ्यावी का, आदी विषयांवर फडणवीस केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून सुरु होणार असून त्याची तयारी करण्यासाठी शक्य तितक्या लवकर हा विस्तार केला जाणार आहे.