१०वीचे पुस्तक फोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत

इयत्ता १० वीचे बालभारतीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग-१ आणि भाग-२ ही पाठय़पुस्तके व्हॉट्सअपवर व्हायरल करण्याच्या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची दादर पोलीस ठाण्याच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी बालभारती यांच्यामार्फत प्रकाशित होणारी सर्व पुस्तके व पाठय़पुस्तक आदी सर्व प्रकाशनाचे स्वामित्व महाराष्ट्र शासनाकडे कायमस्वरूपी घेण्यात येणार आहेत. त्यामुळे शासनाच्या परवानगीशिवाय बालभारतीच्या पाठय़पुस्तकाची पुस्तक विक्रेते छपाई करू शकणार नाहीत, अशी महिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

इयत्ता दहावीचे बालभारतीचे संपूर्ण पुस्तक प्रकाशनापूर्वीच व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याबद्दलची लक्षवेधी सूचना सुनील प्रभू, आशीष शेलार, विजय वड्डेटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आदी सदस्यांनी उपस्थित केली होती. याला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पाठय़पुस्तक मंडळाच्या सात ते आठ व्यक्तींची आणि काही खासगी पुस्तक विक्रेत्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या तपासात कोणीही व्यक्ती दोषी आढळल्यास त्या विरुद्ध कठोर करवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ यांच्यामार्फत तयार करण्यात येणाऱ्या पाठय़पुस्तकांचे स्वामित्व आता शासन आपल्याकडे घेणार आहे, त्यामुळे यापुढे खासगी पुस्तक विक्रेते, गाईड विक्रेते आदींना त्या पुस्तकांची छपाई करता येणार नाही, त्यांना त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागेल असेही, तावडे यांनी स्पष्ट केले.