राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा चाळीसवर; पुढचे चार दिवस उन्हाचा त्रास वाढणार

राजस्थान येथे उष्णतेची लाट येणार असून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश येथील दिवसाच्या तापमानात २ ते ३ अंश से. वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमानातही वाढ होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. रविवारी मुंबईत सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.१ अंश से. राहिले.

देशाच्या वायव्य व मध्य भागात पुढील चार दिवस दिवसांच्या तापमानात वाढ होऊ शकेल. त्यामुळे उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी पारा ४० अंश से. पलिकडे जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवरील दिवसाचे सरासरी ३३ अंश से. पर्यंत राहणारे तापमानही ३५ अंश से. च्या पलिकडे जाऊ शकते. रविवारी राज्यातील सर्वात जास्त तापमान मालेगाव येथे ४२ अंश से. नोंदले गेले. जळगाव, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर व वर्धा येथेही पाऱ्याने चाळीशीचा टप्पा पार केला.

हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की उकाडय़ाची तीव्रता वाढते.  ढगाळ वातावरणामुळे जमिनीलगतच्या हवेतील उष्णता वातावरणात अडकून पडते व रात्रीचे तापमानही कमी होत नाही. गेल्या चार दिवसात ढगाळ वातावरणामुळे दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र येथे उकाडय़ात वाढ झाली होती.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भात रविवारी तुरळक ठिकाणी हलका पाऊस बरसला. मागील चोवीस तासांत गोंदिया येथे १४ मि.मी., उस्मानाबाद १० मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.