मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातील झोपडपट्टीला सोमवारी संध्याकाळी लागलेली आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. आग लागलेली झोपडपट्टी मध्य रेल्वेमार्गावरील मस्जिद बंदर स्थानकाला खेटून असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला. आग नियंत्रणात आल्यामुळे आता ही वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, दरम्यानच्या काळात जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

मस्जिद बंदरच्या नरसी नाथा रोडवर असलेल्या झोपडपट्टीला ही आग लागली होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, शॉक सर्किटमुळे लागलेली ही आग सिलेंडरच्या स्फोटामुळे आणखीनच भडकली. त्यामुळे या परिसरात आगीचे मोठे लोळ उठताना दिसत होते. सुरूवातीच्या काळात आगीची तीव्रता खूपच जास्त होती. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी मध्य रेल्वेकडून जलद मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान,आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आणि पाण्याचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने सुरुवातीच्या काळात आग विझवताना काही अडथळे आले. मात्र, त्यानंतर जवानांनी प्रयत्नांची शर्थ करुन आग आटोक्यात आणली. या आगीत चार ते पाच लहान मुले गंभीररित्या जखमी झाली असून त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोन मुलांची नावे समजली असून यापैकी रमजान हा ७० टक्के तर सलमान २० टक्के भाजला आहे.

ही झोपडपट्टी रेल्वे रूळांच्या खूपच जवळ असल्याने आणि आगीची तीव्रता जास्त असल्याने दरम्यानच्या काळात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण झाला. परिणामी सीएसटी आणि अन्य रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी पाहायला मिळत होती. या सगळ्या गोंधळाचा संध्याकाळी घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मोठा फटका बसला. या काळात मध्य रेल्वेमार्गावरील गाड्या साधारण ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत होत्या.