भाईंदर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले मेजर कौस्तुभ राणे यांना अलोट जनसागराच्या उपस्थितीत साश्रु नयनाने अखेरचा निरोप देण्यात आला. मीरा रोडच्या वैकुंठभूमीत लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव बुधवारी रात्री मुंबईत दाखल झाल्यानंतर गुरुवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ते त्यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी आणण्यात आले. वीरमरण आलेल्या या सुपुत्राचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी यावेळी अलोट गर्दी लोटली होती. यावेळी ‘कौस्तुभ राणे अमर रहे’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणांनी वातावरण अतिशय भावुक झाले होते. दोन तास उलटल्यानंतरही दर्शनासाठी आलेल्यांची रांग कमी होत नव्हती. त्यामुळे अखेर साडे नऊच्या सुमारास कौस्तुभ राणे यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात करण्यात आली.

कौस्तुभ राणे यांचे पार्थिव खांद्यावरून नेत असताना लष्करी अधिकाऱ्यांनादेखील आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. फुलांनी सजवलेल्या लष्करी वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. मीरा रोडच्या शीतलनगर, शांतीनगर  भागातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसरातील दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्यात आली होती. रस्ते फुलांनी सजवलेले होते तसेच मेजर राणे यांच्या पार्थिवावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात येत होती. जागोजागी मेजर राणे यांचे छायाचित्र लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येने नागरिक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

मीरा रोडच्या स्मशानभूमीत अंत्ययात्रा आल्यानंतर महत्त्वाच्या व्यक्ती आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींनाच आत प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे आत प्रवेश करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. संरक्षक भिंतीवर चढूनही काहीजणांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. अखेर राणे कुटुंबीयांनी आवाहन केल्यानंतर नागरिक शांत झाले. अंत्यसंस्काराचे थेट चित्रण स्मशानभूमीबाहेर लावलेल्या मोठय़ा पडद्यावर दाखवण्यात येत होते.

अंत्यसंस्काराआधी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर डिंपल मेहता, खासदार, आमदार तसेच इतर राजकीय नेते, तिन्ही सेनादलांच्या काही आजी माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहून मेजर राणे यांना श्रद्धांजली अर्पण केली. राणे यांची पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई, वडील आणि बहिणी यांनी राणे यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेतले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. वडील प्रकाशकुमार राणे यांनी पुत्राच्या पार्थिवाला अग्नि दिला त्यावेळी मेजर राणे यांची पत्नी कनिका आणि मुलगा देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते. लष्काराच्या जवानांनी यावेळी हवेत तीनवेळा फैरी झाडून मेजर राणे यांना मानवंदना दिली.

लष्करी प्रथेप्रमाणे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेण्याआधी त्यावर असलेला तिरंगा लष्करी अधिकाऱ्यांनी मेजर राणे यांच्या पत्नी कनिका राणे यांच्याकडे सुपूर्द केला. भावना अनावर झालेल्या कनिका यांनी तिरंग्याला कवटाळून आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

गेल्या काही दिवसांपासून मीरा भाईंदर शहरात पावसाने दडी मारली होती. परंतू गुरुवारी सकाळ पासूनच काळ्या ढगांनी आकाशात गर्दी करण्यास सुरुवात केली होती. स्मशानभूमीत मेजर राणे यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे देशासाठी बलिदान केलेल्या वीर योद्धय़ाला वरुणराजाने ही श्रद्धांजली वाहिल्याची भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाली होती.

शोकाकूल जनसागर

मेजर राणे यांच्या बलिदानाने भारावलेल्या हजारो लोकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. दोन तास झाले तरी घरी अंत्यदर्शनासाठीची रीघ ओसरली नव्हती. अंत्ययात्रेतही हजारो लोक सहभागी होते. रस्त्यात जागोजागी पुष्पवृष्टीही केली गेली.

अखेरचे रक्षाबंधन..

येत्या २६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. परंतु राखी बांधण्यासाठी आता आपला लाडका भाऊ आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही, या जाणिवेने मेजर राणे यांची बहीण काश्यपी यांनी त्यांच्या पार्थिवावर राखी ठेवली त्यावेळी सर्वाचीच मने हेलावून गेली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major kaustubh rane cremated in mira road
First published on: 10-08-2018 at 02:00 IST