मुंबईच्या उपनगरीय स्थानकांतील प्लॅटफॉर्म आणि गाडीचा फूटबोर्ड यांच्यातील जीवघेण्या पोकळीबाबत वारंवार आवाज उठवूनही रेल्वे प्रशासनाला ही पोकळी कमी करण्यात अपयश आले आहे. मात्र हा प्रकार प्रवाशांच्या जीवावर बेतत असून रविवारी दादर स्थानकात एक प्रवासी या पोकळीत पडला. मात्र सुदैवाने हा प्रवासी बचावला असून केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर घडलेल्या या घटनेदरम्यान या प्रवाशाला मदत करण्याचे काम आपले नसल्याचा पवित्रा येथील आरपीएफच्या जवानाने घेतल्याचा दावा जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे.
पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून चर्चगेट लोकल पकडत असताना रविवारी सायंकाळी मंगेश चव्हाण (३५) प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्या पोकळीत पडले. सुदैवाने गाडी स्थानकातच असल्याने प्रवासी त्यांच्या मदतीसाठी तातडीने धावून गेले. मात्र त्या वेळी तेथे डय़ुटीवर असलेल्या एका आरपीएफ जवानाकडे मदतीची याचना केली असता, त्याने हे आपले काम नसल्याचे सांगत मदत करण्यास नकार दिला, असे चव्हाण यांच्या पत्नी मिताली यांनी सांगितले. प्रवाशांनी चव्हाण यांना पोकळीतून वर ओढत तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. या अपघातात चव्हाण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.