केंद्रातील यूपीए-२ सरकारवर विविध भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप होत असताना मौन बाळगणे पसंत केलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आधीच सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली असती वा चुकांची कबुली आज देण्यापेक्षा तेव्हाच दिली असती तरी काँग्रेसवर एवढी वेळ आली नसती, असाच काँग्रेसबरोबर मित्र पक्षांमध्येही मतप्रवाह आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी सरकारच्या कारभारात आमच्याकडून काही चुका झाल्याची कबुली दिली. त्यातून सुधारणांचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले. विविध घोटाळ्यांमुळे निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेसची पार दमछाक झाली आहे. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या दारुण पराभवास घोटाळे आणि भ्रष्टाचार हा मुद्दा कारणीभूत ठरला. यामुळेच लोकपाल विधेयक मंजूर करण्याकरिता काँग्रेसला पुढाकार घ्यावा लागला.