दिवाळीत झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा सजल्या असून झेंडू ४० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे. भगवा झेंडू ४० रुपये किलो दराने तर पिवळा झेंडू ६० ते ७० रुपये किलो दराने विकला गेला. पिवळ्या झेंडूला यावेळी बाजारपेठेत मागणीही जास्त होती मात्र या फुलाची आवक कमी असल्यामुळे त्यांचा दर एवढा चढल्याची माहिती भुलेश्वर फुलमंडईच्या साईनाथ शिंदे यांनी दिली. अन्य राज्यांत सप्टेंबरनंतर झेंडूच्या फुलांचे उत्पादन सुरू झाल्याने त्यांच्याकडून इथल्या झेंडूची मागणी कमी झाली. शिवाय,  इथल्या बाजारपेठेत झेंडूची आवकही चांगली राहिली. त्यातल्या त्यात अवकाळी पावसाचा फटका बसल्याने पिवळ्या झेंडूची आवक कमी झाली होती. तरीही याच फुलाला जास्त मागणी असल्याने ७० रुपये किलोपर्यंत पिवळा झेंडू विकला गेला, असे शिंदे यांनी सांगितले. सध्या दिवसाला दोनशे टेम्पो झेंडूची आवक होत आहे. बाजारात झेंडू अजूनही शिल्लक आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे घाऊक बाजारात बुधवारचा दिवस हा झेंडूच्या फुलांना भरपूर मागणी असण्याचा शेवटचा दिवस होता. गुरुवारपासून दर आणखीन खाली येतील, असे विक्रे त्यांचे म्हणणे आहे.