मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा महाविद्यालयाच्या स्तरावर ऑनलाइन घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या पथ्यावर पडला आहे. तुलनेने दरवर्षी कमी निकाल जाहीर होणाऱ्या विधि अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या शेकडो विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

यंदाच्या ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षांमुळे गुणांची उधळण झाली आहे. दरवर्षी विधि अभ्यासक्रमाचा निकाल हा ४५ ते ५० टक्के जाहीर होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांंना जास्तीत जास्त ७५ टक्कय़ांपर्यंत गुण मिळत होते. मात्र यंदा अनेक महाविद्यालयांतील बहुतांश विद्यार्थ्यांंना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. शासकीय विधि महाविद्यालयातील २९७ विद्यार्थ्यांंना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. याशिवाय प्रवीण गांधी महाविद्यालयातील ६२, श्री जयंतीलाल एच. पटेल विधि महाविद्यालयातील ४९, डॉ. डी.वाय.पाटील विधि महाविद्यालयातील ४८, अस्मिता विधि महाविद्यालयातील ४३, कीर विधि महाविद्यालयातील ३१, अ‍ॅड. बाळासाहेब आपटे विधि महाविद्यालयातील २४, हरिया महाविद्यालयातील २३ विद्यार्थ्यांंना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. इतकेच नाही तर गेल्यावर्षी अनेक विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या (एटीकेटी) विद्यार्थ्यांनाही पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षांमुळे निकाल वाढल्याचे प्राध्यापकांनी सांगितले.