मुंबई : राज्यात पुन्हा चित्रपटगृहे, नाटय़गृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृतीगटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीबाबत बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दृकश्राव्य माध्यमातून बैठक बोलाविली आहे. त्यानंतर संबंधितांशी विचारविनिमय करून राज्य सरकार मुखपट्टी सक्तीबाबत निर्णय घेणार आहे.

राज्यात करोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्या वाढत आहे. चीनसह काही देश आणि देशातील काही राज्यांमध्येही करोना रुग्ण आढळून येत आहेत. करोना विषाणूंचे उत्परिवर्तन हा चिंतेचा विषय असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत व्यक्त केले.

राज्यात मुखपट्टी सक्ती काढून टाकण्यात आली व तिचा वापर ऐच्छिक ठेवण्यात आला. तेव्हापासून बहुसंख्य नागरिकांनी मुखपट्टीचा वापर बंद केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही गर्दीच्या ठिकाणी तरी मुखपट्टी वापर सक्तीचा करण्यासाठी राज्य सरकार पावले टाकण्याचा विचार करीत आहे, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.