नीतिमूल्ये, संवादकौशल्यांचा समावेश

मुंबई : देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचा अभ्यासक्रम अखेर वीस वर्षांनंतर आता बदलणार असून नव्या आराखडय़ात नीतिमूल्ये, संवादकौशल्ये, अवयवदानाबाबत रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने होणारी नवी संशोधने, आरोग्यक्षेत्राच्या बदललेल्या गरजा, नवे आजार हे सगळे दरवर्षी शिक्षकांच्या पातळीवर, प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जात असले तरी मूळ अभ्यासक्रम आराखडय़ात गेल्या वीस वर्षांत बदल झाला नव्हता. आता मात्र भारतीय वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. तब्बल वीस वर्षांनंतर अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचा आराखडा परिषदेने जाहीर केला असून पुढील वर्षीपासून अभ्यासक्रम अमलात येईल.

नीतिमूल्ये, दृष्टिकोन, संवाद या घटकांवर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. अनेकदा डॉक्टरांकडून माहिती मिळत नाही, रुग्णांशी संवाद नसतो अशा तक्रारी रुग्ण आणि नातेवाईकांकडून करण्यात येत असतात.

डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये संवादाचा अभाव असल्यामुळे रुग्णालयांमध्ये अनेकदा वादंग होत असतात. त्या पाश्र्वभूमीवर नव्या अभ्यासक्रमात संवाद कौशल्ये, मूल्ये यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवे काय?

’  रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद कसा साधावा, रुग्णांचे समुपदेशन, अवयवदानाबाबत रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन अशा घटकांची नव्याने ओळख करून देण्यात आली आहे.

’ प्रथम वर्षांपासूनच या घटकांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. हा स्वतंत्र विषय नसला तरी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना त्याचे प्रशिक्षण मिळणार आहे.

’ रुग्णांशी संवाद स्थापन करण्याची कौशल्ये, विषयाची हाताळणी करण्याची क्षमता हे घटक यांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येईल.

’ त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य, मानसिक आरोग्य या घटकांसाठीही प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा क्षमता विकास आणि शिकलेल्या घटकांचा प्रत्यक्षात वापर करण्याची क्षमता या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.