मनोरूग्ण म्हणून गेली नऊ वष्रे रस्त्यावर जगणाऱ्या आणि कुटुंबापासून दुरावलेल्या बिहारमधील एका २५ वर्षांच्या युवकाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्याचे काम मुलुंडमधील नेपच्युन फाऊंडेशनने ठाणे प्रादेशिक रूग्णालयाच्या सहकार्याने केले. राजेशला (नाव बदलेले) नेण्यासाठी त्याचे वडील आणि भाऊ मुंबईला आले तेव्हा राजेशला पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला..

नेपच्युन फाऊंडेशनने आत्तापर्यंत अशा ९७ मनोरूग्णांची सुखरुप घरी पाठवणी केली असून यात नेपाळ, आसाम, उत्तर प्रदेश, झारखंड, भूतान, ओरीसा आदी विविध ठिकाणच्या मनोरूग्णांचा समावेश असल्याचे फाऊंडेशनचे अमित पारिख यांनी सांगितले.

३० नोव्हेंबर २०१५ या दिवशी नेपच्युन फाऊंडेशन या सामाजिक क्षेत्रात काम करणारया संस्थेच्या हेल्पलाईनवर मुलुंडच्या लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावर एक मनोरूग्ण तरूण सापडला असल्याची माहिती मिळाली. फाऊंडेशनने पोलिसी सोपस्कार पार पाडून त्या युवकाला ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले.

सुमारे दहा महिने त्यावर उपचार सुरू होते. त्यातून त्याची मानसिक स्थिती उत्तम झाली. मनोरूग्णचिकित्सकांच्या मदतीने राजेशकडे त्याच्या घरची, कुटुंबाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याने आपले गाव बिहारमध्ये असल्याचे सांगितले.

फाऊंडेशनने बिहारमधील त्या गावात राजेशच्या कुटुंबियाशी संपर्क साधून राजेश रूग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. रूग्णालय प्रशासनाने राजेशला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविले. राजेश आणि त्यांच्या नातेवाईकांची बिहारला जाण्याचीही व्यवस्था केली.

राजेशला ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात भरती केल्यानंतरही फाऊंडेशन त्याच्याकडे लक्ष देत होते. राजेशचे वडील आणि भावाच्या म्हणण्यानुसार तो दोन वर्षांपूर्वी घरातून अचानक गायब झाला होता. शोध घेण्याचा खूप प्रयत्न करुनही त्याचा पत्ता लागला नाही. घरच्यांनी आशा सोडलीच होती. बिहारच्या स्थानिक पोलीस ठाण्यात तो हरविला असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.