स्थलांतरित पक्षी म्हटले की आठवण येते ती फ्लेमिंगोंची.. कच्छच्या रणात येणाऱ्या रोहित पक्ष्यांनी अजूनही मुंबईत पाऊल ठेवले नसले तरी मुंबईत वेगवेगळ्या प्रांतांतून उडते पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. खाडीकिनारी विविध प्रकारचे बगळे आणि बदकांच्या रांगा दिसत असून गिरगाव चौपाटीवर सीगल पक्ष्यांचे थवेच्या थवे उडताना दिसत आहेत.
कडाक्याच्या थंडीतून वाचण्यासाठी तुलनेने उबदार असलेल्या प्रदेशाकडे पक्षी स्थलांतरित होतात. साधारण नोव्हेंबरच्या मध्यापासून मुंबईत अनेक पाहुणे दिसण्यास सुरुवात होते. देशाच्या उत्तर भागातून जसे पक्षी दक्षिणेकडे येतात तसेच अगदी सायबेरिया, युरोपमधूनही तुतारीसारखे (सॅण्ड पायपर) पक्षी मुंबईपर्यंत मजल मारतात. अनेक प्रकारचे बगळे, वंचक, शराटी, सुरय, कुरल, समुद्रपक्षी, खंडय़ा असे अनेक पक्षी समुद्रकिनाऱ्यावर सध्या डेरा जमवून आहेत. यातील काही पक्षी वर्षभर मुंबईत दिसतात. मात्र या काळात त्यांची संख्या वाढते. सध्या तर गिरगाव चौपाटीवर सीगल पक्ष्यांच्या पांढऱ्याशुभ्र थव्यांनी सजली आहे. अर्थात यात स्थलांतरित पक्ष्यांचा अनभिषिक्त राजा रोहित (फ्लेिमगो) मात्र गायब आहे. अजूनही मुंबईच्या किनाऱ्यावर रोहित पक्षी आल्याचे दिसलेले नाही, असे पक्षीतज्ज्ञ पंडय़ा यांनी सांगितले. समुद्रकिनाऱ्यावरील पक्ष्यांचे अस्तित्व सहजी नजरेस पडत असले तरी त्यासोबतच जंगलातही पाहुणे पक्षी येऊ लागले आहेत. वेडा राघूसारखे अनेक पक्षी पक्षीप्रेमींच्या दृष्टीस पडत आहे. पानगळतीचाही ऋतू आता सुरू होणार असल्याने पक्षीनिरीक्षणासाठी हा उत्तम काळ समजला जातो. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याशिवाय विविध संस्थांकडून या काळात पक्षीनिरीक्षणाचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
‘रोहित’ मात्र गायब
उरणमध्ये काही रोहित (फ्लेमिंगो) पक्षी दिसतात मात्र ते वर्षभर इथेच राहतात. ते स्थलांतरित नाहीत, असे पक्षी अभ्यासक आदेश शिवकर म्हणाले. रोहित पक्षी साधारण डिसेंबरच्या मध्यावर कच्छमधून मुंबईत येतात. मात्र यावेळी कच्छमध्ये चांगला पाऊस पडला असल्याने पक्ष्यांचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. इतर स्थलांतरित पक्षी मात्र शहरात व परिसरात दिसू लागले आहे, असेही शिवकर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Migrating birds in mumbai
First published on: 08-12-2015 at 08:11 IST