ठाणे परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेच्या नजरकैदेत असलेले माजी उपमहापौर तसेच भाजपचे ठाणे शहराध्यक्ष मिलिंद पाटणकर यांनी स्वपक्षातील नेत्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप बुधवारी केला. या मारहाणीत आघाडीवर असलेले पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले आणि नवनिर्वाचित उपमहापौर मुकेश मोकाशी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मिलिंद पाटणकर यांच्या महापालिकेतील दालनात तोडफोड केल्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी युतीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली असून त्यात शिवसेनेच्या तिघांचा समावेश आहे. असे असतानाही शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून कोणतीही मारहाण झालेली नाही, अशी कोलांटउडी पाटणकर यांनी मारली.
 मिलिंद पाटणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वपक्षीय नेत्यांवर टीकेचे प्रहार केले. परिवहन सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप सदस्य अजय जोशी यांनी विरोधी मतदान केले पण, त्याच्याशी माझा संबंध नाही. ठाणे शहर मतदार संघ सुरक्षित असल्यामुळे मिळावा, या मागणीसाठी गेली दोन वर्षे आग्रही होतो. त्यामुळे स्वपक्षातील दुसऱ्या गटाने मला उपमहापौर आणि शहराध्यक्षपद देऊन शांत करण्याचा विचार केला होता, असा आरोप पाटणकर यांनी केला. शारीरिक व मानसिक दबाब टाकून मला उपमहापौरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्यातरी, भाजप सोडण्याचा विचार नाही, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेन, असा दावाही त्यांनी केला आहे.
मोकाशींविरोधात नव्याने तक्रार
टीएमटी सभापतीपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर महापालिकेतील उपमहापौर दालनात तोडफोड केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक मुकेश मोकाशी यांना नौपाडा पोलिसांनी अटक करून त्यांची जामिनावर सुटका केली आहे. असे असतानाच मोकाशी आणि वाघुले यांच्याविरोधात पाटणकर पोलिसात नव्याने तक्रार करणार आहेत. त्यामुळे मोकाशी यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मारहाण केलीच नाही
मिलिंद पाटणकर यांना मारहाण केलीच नाही तसेच त्यांनी वृत्तवाहिन्यांशी संपर्क साधून हे स्पष्टही केले आहे. त्या घटनेचे फुटेज पोलिसांनी तपासले असून त्यांना त्यात काहीच आढळलेले नाही. तसेच कोणत्याही समाजाविषयी अपशब्दही वापरलेले नाहीत, अशी सावध प्रतिक्रिया देत नगरसेवक संजय वाघुले आणि मुकेश मोकाशी यांनी सारवासारव केली.