नगरमधील सामूहिक बलात्कार प्रकरण, नागपुरातील मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेले कैदी, तडीपार गुंडाकडून भररस्त्यात तरुणीला विवस्त्र करून झालेली मारहाण.. या व अशा कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या घटनांवरून राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरले असतानाच डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली असली तरी पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचेच चित्र निर्माण झाले आहे. अटक केलेल्या दोघांची नावे अजमत (२०) व फुर्शीद (२२) अशी आहेत.
डोंबिवलीतील मानपाडा गावाच्या वेशीवर इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी अजमत व फुर्शीद हे दोघे प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच इमारत सुशोभिकरणाचे काम करतात. मानपाडय़ातील या इमारतीच्या शेजारी आणखी एक बांधकाम सुरू आहे. त्यात चौदा वर्षांची पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांसह राहाते. तिचे वडील मजुरीचे काम करतात. ही मुलगी शालेय शिक्षण घेते. अजमत व फुर्शीद यांचा संबंधित मुलीवर डोळा होता. ती कुठे जाते, शाळेतून कधी घरी येते, तिच्या घरात कोण कोण आहेत यावर ते पाळत ठेवून होते. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही मुलगी घरातील कोणालाही सोबत न घेता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर नैसर्गिक विधीसाठी आली. नैसर्गिक विधी आटोपून ती परत घरी जात असताना तिच्यावर पाळत ठेऊन असलेल्या अजमत, फुर्शीद यांनी तिला अडवले. दोघांनीही तिचे तोंड आवळले, तिला धक्काबुक्की केली व बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या एका कोपऱ्यात नेऊन तिच्यावर दोघांनी आळीपाळीने बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास मारण्याच्या धमक्याही अजमत व फुर्शीद यांनी संबंधित मुलीला दिल्या. या दोघांच्या तावडीतून सुटका करून घेत मुलीने घर गाठले आणि घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या वडिलांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अजमत व फुर्शीद या दोघांनाही अटक केली.

बलात्काराच्या वाढत्या तक्रारी
पुरोगामी, प्रगत अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात बलात्काराच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. बलात्कार व विनयभंगाच्या सर्वाधिक तक्रारींची नोंद गेल्या वर्षी महाराष्ट्रात झाली आहे. २०१४ मध्ये राज्यात बलात्कार व विनयभंगाच्या १३ हजार ८२७ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या.