मिरा रोड येथील शांती नगर सेक्टर १ परिसरात रस्त्यावर नुकत्याच जन्मलेल्या बाळाला टाकून एका आईने चक्क पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरा रोड पूर्व येथे शांती नगर सेक्टर १ हा परिसरातील निर्जन जागेत मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एक नवजात अर्भक आढळून आले. नया नगर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी बाळाला पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले गेले. जन्मलेले बाळ हे स्त्री जातीचे असून प्रथम दर्शनी ते अविकसित (प्रिमेचिओर) स्वरूपाचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंधाराचा गैरफायदा उचलत या नवजात बाळाला रस्त्यावर सोडले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बाळावर सध्या रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरु असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांनी दिली.