दोन चिमुकल्या मुलींची हत्या करून आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मिरा रोड येथे शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. शबिना खान असे या महिलेचे नाव आहे.
मिरा रोडच्या साईबाबा नगर येथील सुंदर विहार या इमारतीच्या १०४ क्रमांकाच्या सदनिकेत राहाणाऱ्या असिफ  सैय्यद खान याचे बोरिवलीत चपलांचे दुकान असून शनिवारी तो कामासाठी बाहेर गेला होता. असिफचे वडिल संध्याकाळी नमाजासाठी बाहेर पडले होते. असिफ व शबिनाचा सहा वर्षांचा मुलगा यासिर भूक लागल्याने आईला हाक मारू लागला, परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता आईने गळफास घेतल्याचे त्याला दिसले. त्याने धावत बाहेर जाऊन शेजाऱ्यांना हा प्रकार सांगितला. शेजारी घरात आले तेव्हा त्यांना घरातील पाण्याच्या पिंपात अलिमा (साडेतीन वर्षे) आणि नरी (दोन महिने) या मुलींचे मृतदेह आढळले. सबिनाने दोन्ही चिमुकल्यांना पाण्यात बुडवून नंतर आत्महत्या केल्याचे मिरा रोड पोलिसांनी सांगितले. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र शुक्रवारी रात्री असिफ आणि सबिना यांच्यात पैशांवरून भांडण झाल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.