मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन एमएमआरडीएचा प्रस्ताव; राज्य सरकार-कर्मचारी संघटना अनुकूल

प्रवाशांची गर्दी कमी करण्याकरिता रेल्वेकडून सातत्याने सादर केला जाणारा कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे सरकारदरबारी धूळ खात पडून असताना मेट्रोच्या बांधकामासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयीन कामाच्या वेळा बदलण्याबाबत विचार सुरू आहे. राज्य सरकारबरोबरच कर्मचारी संघटनांकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालयांमधील कर्मचारी वेगवेगळ्या वेळी कार्यालयात हजेरी लावणार आहेत.

डी. एन. नगर ते मंडाले या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो-२बचे वांद्रे-कुर्ला संकुलातील काम लवकरच सुरू होणार आहे. यामुळे या भागातील दोन मार्गिका पूर्णपणे बंद राहणार आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या भागातील कार्यालयातील कर्मचारी संघटनांशी तसेच कार्यालय प्रशासनाची चर्चा करून कार्यालयीन वेळ एकच ठेवण्याऐवजी सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान वेगवेगळ्या ठेवाव्यात, असा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर संकुलातील सर्व कार्यालये आणि सरकारी यंत्रणांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रवीण दराडे यांनी सांगितले. या परिसरात सरकारी, बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच खासगी कंपन्या, वित्त कंपन्या, विविध देशांचे दूतावास अशी विविध कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांमध्ये मिळून सुमारे चार लाख कर्मचारी काम करतात, तर या कर्मचाऱ्यांच्या सुमारे २० ते २५ हजार गाडय़ा या परिसरात येत असतात. यामुळे सकाळी कार्यालये सुरू होण्याच्या वेळी व संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळी या परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या परिसरात मेट्रो २बचे काम सुरू होणार आहे. हे काम सुरू करण्यासाठी दोन्ही दिशांच्या मार्गिकेतील एक-एक मार्गिका बंद ठेवावी लागणार आहे. परिणामी या परिसरात कार्यालयीन वेळांच्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी अधिक होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्राधिकरणाने कार्यालयीन कामाच्या वेळेत बदल करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याचबरोबर नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी या रस्त्याच्या कडेलगतची शेवटची मार्गिका सध्या पेव्हर ब्लॉकने तयार करण्यात आली आहे. त्या मार्गिकेचेही काँक्रीटीकरण करण्यात येणार असून तो मार्गही प्रवासासाठी खुला केला जाईल, असेही दराडे यांनी सांगितले.

डी. एन. नगर ते मंडाले या मार्गावर धावणाऱ्या मेट्रो-२बचे वांद्रे-कुर्ला संकुलात एमएमआरडीए कार्यालय, प्राप्तिकर कार्यालय, आयएलएफएस ही प्रमुख तीन स्थानके असणार आहेत. याचबरोबर मेट्रो-३चेही स्थानक असणार आहे. यामुळे या भागात भविष्यात मेट्रोची जोडणी मिळून येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे; पण भविष्यातील सुखकर प्रवासासाठी त्यांना वर्तमानात काहीसा त्रास सहन करावा लागणार आहे. हा त्रास कमीत कमी कसा होईल, याचा प्रयत्न प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

दरम्यान, कार्यालयीन वेळा बदलण्याच्या प्रस्तावावर कार्यालय प्रशासन आणि कर्मचारी संघटना सकारात्मक असल्याने त्यांच्या सहकार्याने हे बदल होऊ शकतील, अशी अपेक्षा प्राधिकरणातर्फे व्यक्त करण्यात येत आहे.