मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर अनेक ठिकाणी पाणीही तुंबल्याचं पाहायला मिळालं होतं. दरम्यान, अनेकांच्या घरातही पावसाचं पाणी शिरलं होतं. यावरून मनसेनं पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “सरकारडे ना करोनाचं नियोजन आहे ना मुंबईचं. २५ वर्षे शिवसेना सत्तेत आहे आणि दरवर्षी हीच गोष्ट घडते. यातून आम्ही शिकलो असं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं. तुम्हाला शिकायचंय म्हणून आम्हाला गिनी पिग बनवू नका,” असं म्हणत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

“कोणत्याही प्रकारचं नियोजन सध्या दिसत नाही. आपत्ती व्यवस्थापनाची एसओपी अद्यापही तयार नाही. दरवेळी लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार सुरू आहेत. यांची नालेसफाईदेखील कधी पूर्ण होत नाही. काल पालिका आयुक्तही पाऊस अधिक पडल्याचं म्हणाले. कदाचित ते या ठिकाणी नवे असावेत म्हणून त्यांना हा पाऊस अधिक वाटला असावा,” असा टोलाही देशपांडे यांनी लगावला. न्यूज १८ लोकमतशी साधलेल्या विशेष संवादात त्यांनी याविषयावर भाष्य केलं.

या सर्व बाबीविषयी लोकांच्या मनात संताप आणि चीड आहे. लोकांची सध्याची स्थिती बिकट आहे आणि त्यातच अशाप्रकारचं ढिसाळ नियोजन सुरू आहे. जर महानगरपालिका आमचा जीव वाचवणार नसेल तर कसले कर आम्ही महापालिकेला द्यायचे असा सवालही त्यांनी यावेळी केला.

२६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. मंगळवार रात्रीपासून बुधवार सकाळपर्यंत मुंबईत २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली. हा एवढा पाऊस अतीवृष्टीमध्ये गणला जातो. सप्टेंबर महिन्यात मागील अडीज दशकांमध्ये पहिल्यांदाच २४ तासांमध्ये मुंबई शहरात एवढा पाऊस पडला. मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९९४ ते २०२० या कालावधीमध्ये सप्टेंबर महिन्यात यापूर्वी एका दिवसात मुंबईत एवढा पाऊस कधीच पडला नव्हता. तसेच १९७४ पासून सप्टेंबर महिन्यात २४ तासांमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे.