राष्ट्रीय हरित लवाद आणि मुंबई महापालिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे मुंबईत यंदा फटाके वाजविणाचे प्रमाण मर्यादित दिसून आले. अनेकांनी भुईचक्र , पाऊस, फुलबाजी अशा विनाआवाजी फटाक्यांना पसंती दिली. दरम्यान, शहरात आवाजाची सर्वाधिक पातळी शिवाजी पार्क येथे १०५.५ डेसीबल इतकी नोंदवण्यात आली.

महापालिकेने लक्ष्मीपूजनाला विनाआवाजी फटाके  वाजविण्याची परवानगी दिली होती. मुंबईतल्या अनेक भागांत हे आदेश धुडकावून वसुबारसपासून फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात करण्यात आली. मात्र सुतळी बॉम्ब, लवंगी किंवा अन्य माळा टाळून कमी प्रमाणात धूर ओकणाऱ्या पारंपरिक आणि फॅन्सी फटाक्यांचा वापर होत असल्याने ध्वनिप्रदूषणाची पातळी कमी नोंदली गेली.

आवाज फाऊंडेशनच्या सुमेरा अब्दुलाली यांनी शनिवारी रात्री १० वाजण्यापूर्वी (फटाके  फोडण्याची मुदत संपण्याआधी) शहरातल्या काही भागांत आवाजाची पातळी मोजली. शहरात आवाजाची सर्वाधिक पातळी शिवाजी पार्क येथे १०५.५ डेसीबल इतकी नोंदवण्यात आली. शांतता क्षेत्र जाहीर झाल्यापासून पहिल्यांदाच शिवाजी पार्क येथे फटाक्यांचा इतक्या मोठय़ा प्रमाणात वापर झाला. मात्र गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा वापर कमी आढळल्याचा दावा त्यांनी केला.

गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान शहरात सर्वाधिक आवाजाची पातळी ११२.३, २०१८ मध्ये ११४.१, २०१७मध्ये ११७.८ इतकी नोंदवण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.

फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी, वायुप्रदूषणाबाबत नागरिक अधिकाधिक जागरूक होत आहेत. करोनामुळे क्रयशक्ती आटल्याने फटाक्यांच्या खरेदीबाबत नागरिकांनी आखडता हात घेतला आणि प्रशासनानेही जबाबदारी लक्षात घेत फटाके  फोडण्यावर निर्बंध घातले. महापालिकेच्या बंदीने बराच फरक पडल्याचे निरीक्षण अब्दुलाली यांनी नोंदवले.

ट्रॉम्बे परिसरात अवैधरीत्या फटाके  विकणाऱ्या फे रीवाल्यांविरोधात कारवाई के ली. स्फोटक पदार्थ कायद्यानुसार दंड आकारल्याची माहिती ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सिद्धेश्वर गोवे यांनी सांगितले.

पोलिसांची गस्त..

* दिवाळीच्या चार दिवसांमध्ये फटाके  वाजतात. अभ्यंगस्नान आणि लक्ष्मीपूजनानंतर फटाक्यांची आतषबाजी शिगेला पोचते.

* मात्र यंदा शनिवारी पहाटे तुरळक फटाके वाजले. रात्री, लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतरही फटाक्यांची आतषबाजी मर्यादित स्वरूपात होती.

* आवाजी फटाक्यांचा वापर होताच शहराच्या अनेक भागांतून पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला तक्रोरी प्राप्त होत होत्या.

* त्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक त्या त्या ठिकणी जाऊन चाचपणी करत होते. पोलिसांच्या या गस्तीमुळेही आवाजी फटाक्यांना चाप बसला.

* रविवारी फटाके  फोडण्यास परवानगी नसली तरी आतषबाजी मर्यादित स्वरूपात सुरूच राहिली.