मुंबई : देशाचे ऐक्य टिकवण्यासाठी धर्मावर आधारित तेढ योग्य नसून दीर्घकाळात त्याचे आर्थिक क्षेत्रासह सर्वच घटकांवर दुष्परिणाम होतील आणि त्यातून देश आणि राज्य उद्ध्वस्त होईल , असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात मंगळवारी दिला.

आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात मंगळवारी सुप्रिया सुळे यांची मुलाखत झाली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राजकारणातील वाढता थिल्लरपणा, धोरणात्मक कामे व योजनांच्या अंमलबजावणीबाबत अनास्था आदी विविध विषयांवर सुप्रिया सुळे यांनी परखड भाष्य केले.

केंद्रातील सत्ताधारी व महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राष्ट्रवादीला लक्ष्य करणे सुरू आहे. आम्ही त्यांना हवेहवेसे वाटतो यातच सारे गुपित लपले आहे. सत्तेचा गैरवापर करून ईडी, सीबीआयसारख्या यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरू आहे. सूडाच्या राजकारणाचे बळी व्हा किंवा त्यांच्याशी लढा हा पर्याय असतो. आम्ही मात्र लढा देत राहू, असा निर्धार सुळे यांनी व्यक्त केला. दहशतवाद्यांना निधी मिळू नये यासाठी तयार करण्यात आलेल्या काळा पैसा प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग ईडी आज करत आहे. तो कायदा यूपीए सरकारने मंजूर केला. त्यावेळी विरोधात असलेले भाजपचे नेते या कायद्यातील काही तरतुदींमुळे मोठा गैरवापर होईल असा इशारा देत होते, याची आठवण करून देत त्या तरतुदी करण्यात चूकच झाली, अशी कबुली त्यांनी दिली.

काँग्रेस-राष्ट्रवादीतून जे भाजपमध्ये गेले ते जाहीरपणे आता ईडी किंवा सीबीआयची नोटीस येण्याची भीती नसल्याने शांत झोप लागते असे सांगतात. यातच भाजप कशा पद्धतीने या यंत्रणांचा दुरुपयोग करतो, हे स्पष्ट होते. नवाब मलिक यांना अशाच प्रकारे कायद्याचा गैरवापर करून अटक केली असल्याने त्यांना मंत्रिपदी कायम ठेवण्यात काहीच चूक नाही, असे समर्थनही त्यांनी केले.

पूर्वीचे नेते अधिक प्रगल्भ होते हे वारंवार जाणवत राहते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कर्मयोगी नेते आहेत. केवळ तेच नव्हे तर त्या काळातील कोणत्याही पक्षाचे नेते-मंत्री आपल्याला देश-राज्य उभे करायचे आहे या विचाराने झपाटले होते. त्यातूनच शाळा-महाविद्यालये सुरू करा, रस्ते-धरण बांधा, औद्योगिकीकरणाला चालना द्या, कुपोषण, कमी वंचित घटकांसाठी योजना आखा, यातच ते गुंतले होते. कर्मकांड-अंधश्रद्धेचा समाजावरील पगडा दूर व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. आता मात्र सारे उलटे सुरू आहे, अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर जब्बार पटेल आदी त्या काळातील लोकांचे राजकारण-समाजकारणावरील चित्रपट आज लागले तर लोक दगड मारतील इतकी समाजात घसरण झाल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी केले.

मध्यान्ह भोजन योजना सुरळीत होण्याची गरज

करोनामुळे शाळांमधून मुलांना दिले जाणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे गाडे थोडे रुळावरून घसरले. आता परिस्थिती सुधारत असली तरी मध्यान्ह भोजन हा लाखो विद्यार्थाच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या योजनेची सुरळीत अंमलबजावणी व्हावी यासाठी मी आग्रही असून ठिकठिकाणी परिस्थिती सुधारत आहे की नाही याकडे लक्ष देत आहे. सोलापुरातून काही संदेश आल्यावर मी तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी बोलले व त्यांनी दोन दिवसांतविद्यार्थ्यांना जेवण मिळेल याची व्यवस्था लावली, असा अनुभव त्यांनी सांगितला. धार्मिक तेढ वाढवण्यात गुंतलेल्या विरोधकांनी अशा गोष्टींवरून आवाज उठवला असता तर ते लोकहिताचे काम ठरले असते, असे सुळे म्हणाल्या.

या देशात सर्व धर्म एकत्र व सुखाने नांदतात हीच भारतीय असण्याची गंमत आहे. राज्यात भोंगे वाजवून आणि हनुमान चालीसा म्हटल्याने महाराष्ट्राचे काय होणार?

सुप्रिया सुळे

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सहप्रायोजक  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

आशीष शेलार यांच्याशी आज संवाद

‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवाद मालिकेत भाजप नेते आशीष शेलार हे आज, बुधवारी सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.सहभागासाठी..  http://tiny.cc/LS_Drushti_ani_Kon2022  येथे ऑनलाइन नोंदणी