ओळखपत्राची रंगीत प्रत न आणल्याने दहा उमेदवारांना प्रवेश नाकारला; राज्यात अनेक केंद्रांवर प्रकार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नव्या नियमामुळे रविवारी परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालय या केंद्रावरील पूर्व परीक्षेला दहा परीक्षार्थीना मुकावे लागले. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेल्या ओळखपत्राची रंगीत प्रत (कलर झेरॉक्स) आणणे बंधनकारक होते. ती न आणल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. या अटीमुळे राज्यातल्या अनेक केंद्रांवर असाच प्रसंग ओढवला होता. मात्र अनेक केंद्रांवर मानवतेच्या दृष्टिकोनातून परीक्षार्थीना प्रवेश देण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका क्रमांक १ची परीक्षा रविवारी सकाळी १० वाजता सुरू होणार होती. यासाठी दीड तास आधी केंद्रांवर उमेदवारांनी हजर राहण्याची सूचना होती. ९ ते ९.३० या वेळेत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार होता. यातील काही विद्यार्थी बाहेरच्या राज्यांतून आले होते. अनेक परीक्षार्थीना ओळखपत्राची रंगीत प्रत आणण्याची अट केंद्रावर पोहोचल्यावर लक्षात आली. रंगीत प्रत देणारी दुकाने बंद असल्याने परीक्षार्थीचा गोंधळ उडाला. काही ठिकाणी प्रत मिळवून परत केंद्रांवर येईपर्यंत परीक्षार्थीना उशीर झाल्याने प्रवेश नाकारण्यात आला. मात्र दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या प्रश्नपत्रिका क्रमांक २च्या परीक्षेसाठी त्यांना प्रवेश देण्यात आला. ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाने रंगीत प्रत नसणाऱ्या उमेदवारांना सकाळच्या परीक्षेसाठी प्रवेश दिला आणि दुपारची परीक्षा सुरू होण्याआधी रंगीत प्रत जमा करण्यास सांगितले.

यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेला ३ लाख ६० हजार उमेदवार बसले होते. परीक्षेच्या आठ दिवस आधीच सर्वाना अटी-शर्तीबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. पण तरीही काही उमेदवारांनी ओळखपत्राची रंगीत प्रत आणली नाही, अशा उमेदवारांना प्रवेश देण्याची मुभा आम्ही दिली होती. मात्र जे उमेदवार रंगीत प्रत आणण्यासाठी परत गेले असतील त्यांना कें द्रावर परतायला उशीर झाला असावा. याची माहिती केंद्रप्रमुखांना नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला असेल. मात्र परीक्षेबाबतच्या सर्व सूचना आधी देऊनही काही उमेदवार परीक्षेला मुकले. बायोमेट्रिक पद्धतीने परीक्षार्थीची हजेरी घेण्याचा निर्णय आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी आहे.    – चंद्रशेखर ओक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष