scorecardresearch

एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे परिपत्रक बनावट ; पोलिसांत तक्रार दाखल

१० मार्चपर्यंत हजर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा एसटी महामंडळाचा मानसही नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.

मुंबई: संपात सहभागी झालेल्या व सध्या आपल्या कर्तव्यावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे एसटी महामंडळाचे एक कथित परिपत्रक समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी वर्गाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांची स्वाक्षरी असलेले, ७ तारखेचे हे परिपत्रक बनावट असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. 

कर्मचाऱ्यांमध्ये हेतूपुरस्सर संभ्रम निर्माण करुन त्यांना आपल्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या गैर उद्देशाने कोणीतरी अज्ञात व्यक्ती अथवा समूहाने हे परिपत्रक प्रसारित केल्याचे महामंडळाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. अशा व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी तक्रार एसटी महामंडळाच्यावतीने दाखल केली आहे. १० मार्चपर्यंत हजर होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्याचा एसटी महामंडळाचा मानसही नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी व सामान्यांचे हाल होत असून खासगी वाहतुकदारांकडून प्रचंड लूट सुरु आहे. त्यामुळे संपकऱ्यांनी तूर्त संप स्थगित करुन एसटी सुरु करावी आणि सरकारनेही सर्व मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा, या मागणीसाठी १० मार्चला विधिमंडळासमोर एसटी वाचवा कृती समितीतर्फे धरणे दिले जाईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msrtc file police complaint over fake circular of action against st employees zws

ताज्या बातम्या