scorecardresearch

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा; कामगार न्यायालयाचा निर्णय

कामगार न्यायालयात महामंडळाच्या वतीने वकील गुरुनाथ नाईक यांनी युक्तिवाद केला.

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कामगारांचा संप मुंबईच्या कामगार न्यायालयाने सोमवारी बेकायदेशीर ठरवला. कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे वाहतूक बंद पडून प्रवाशांचे हाल होत असल्याने संप बेकादेशीर ठरविण्यासाठी महामंडळाने मुंबईसह राज्यभरातील सर्व कामगार न्यायालयात तक्रारी दाखल केल्या आहेत.

याबाबत मुंबईच्या कामगार न्यायालयात महामंडळाने दाखल केलेल्या तक्रारीवर सोमवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी पुकारलेला संप बेकायदेशीर ठरवला. या निर्णयामुळे महामंडळाला दिलासा मिळाला आहे. महामंडळाने आतापर्यंत कामगारांविरोधात केलेल्या निलंबन, सेवासमाप्ती तसेच बडतर्फसारख्या कारवाया वैध ठरणार आहेत. या कारवाया मागे घेण्याचा त्यांना आता अधिकार राहिलेला नाही. कामगार न्यायालयात महामंडळाच्या वतीने वकील गुरुनाथ नाईक यांनी युक्तिवाद केला.

यापूर्वी औद्योगिक न्यायालयानेदेखील २९ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार कामगारांनी कोणत्याही बेकायदेशीर संपावर जाऊ नये, असे आदेश दिले होते. तरीही कामगारांचा संप सुरूच होता. दरम्यान, राज्यातील एकूण ११ हजार २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या कारवाईत महामंडळाला अपेक्षित उत्तर न देणाऱ्या ६ हजार २९ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली असून या नोटिशीलाही उत्तर न देणारे ३ हजार ८६२ कर्मचारी बडतर्फ करण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Msrtc workers strike illegal labor court decision zws

ताज्या बातम्या