कांदिवलीत एकाच सोसायटीत आढळले १७ कोविड रुग्ण, सोसायटी सील

उपनगरात डेल्टा प्लसचे पाच रुग्ण आढळल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे

Mumbai 17 cases of Covid19 in a single housing society in Kandivli
कांदिवलीमध्ये महापालिकेला पाच डेल्टा प्लस रुग्ण आढळले आहेत. (प्रातिनिधीक छायाचित्र)

मुंबई महापालिकेच्या प्रयत्नानंतरही शहारातून करोनाचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही. मुंबईत करोनासोबत आता डेल्टा प्लसचेही रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईतल्या कांदिवली परिसरातील एकाच इमारतीत करोनाचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. कांदिवली पश्चिम येथील वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री इमारतीत १७ जणांना करोनाची लागण झाल्याने सोसायटीला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच पालिकेला मुंबई उपनगरात पाच डेल्टा प्लस रुग्णही आढळून आले आहेत.

१७ पैकी १० रुग्ण बरे झाले आहेत आणि सात अजूनही उपचार घेत आहेत. त्यापैकी दोन रुग्णालयात आहेत. कांदिवलीतील रहिवाशांसाठी आणखी एक चिंता म्हणजे महापालिकेला पाच डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी चार पूर्व भागात आणि एक पश्चिम भागात आहे.

आर दक्षिण प्रभागाच्या सहाय्यक महापालिका आयुक्त संध्या नांदेडकर म्हणाल्या, “शहरात हळूहळू प्रकरणे वाढत आहेत आणि तज्ज्ञांच्या मते आम्ही पुढील महिन्यात तिसऱ्या लाटेची अपेक्षा येऊ शकते. लोकांनी करोनाला हलक्यात घेऊ नये. सण असेल तर एकत्र जमा होणे टाळायला हवं. आम्ही आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक काम करत आहोत. आम्हाला १७ कोविड रुग्ण आढळल्यानंतर महावीर नगर येथील सोसायटीला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.”

“आर दक्षिण प्रभागामध्ये पाच डेल्टा प्लस रुग्ण देखील आहेत. ज्या इमारतींमध्ये डेल्टा प्लसची प्रकरणे आढळली आहेत त्या सील करण्यात आल्या आहेत. आम्ही त्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवत आहोत,” असे नांदेडकर म्हणाल्या.

वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री सोसायटीचे सचिव हितेश महात्रे म्हणाले, “सोसायटीमध्ये १२५ सदस्य आहेत आणि आम्ही नियमितपणे स्वच्छता करतो आणि सर्व खबरदारी घेतो. सात रुग्णांपैकी दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गेल्या चार दिवसात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. आम्ही ३५ लोकांच्या चाचण्या घेतल्या आणि एकही चाचणी पॉझिटिव्ह आली नाही. आमच्याकडे डेल्टा प्लसचा कोणताही रुग्ण नव्हता.”

दरम्यान, मुंबईत करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिका सज्ज झाली असून ही लाट रोखण्यासाठी मुंबईत पुन्हा सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आरोग्य केंद्रे, दवाखाने, सार्वजनिक शौचालये, झोपडपट्टय़ा, चाळी आणि अरुंद गल्ल्यांमध्ये फवारणी करून त्या निर्जंतूक करण्याचा पालिकेचा मानस आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai 17 cases of covid19 in a single housing society in kandivli abn

ताज्या बातम्या