मध्य रेल्वेच्या ‘डीसी-एसी’ विद्युतप्रवाह (डायरेक्ट करंट- अल्टरनेटिव्ह करंट) परिवर्तनास शनिवारी मध्यरात्रीचा मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे मध्यरात्री १२ ते पहाटे किमान ६ वाजेपर्यंत एकही उपनगरीय लोकल धावणार नाही. रविवार सकाळपासून मात्र मध्य रेल्वेवर धावणाऱ्या लोकलना वेग मिळणार आहे.
मध्य रेल्वेवरील विद्युत प्रवाह परिवर्तनामध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे दिवसेंदिवस घोळ वाढत चालला होता. तांत्रिक बिघाड आणि त्यामुळे उशिरा धावणाऱ्या लोकल या सत्राला प्रवाशांना तोंड द्यावे लागत होते. विविध कारणांमुळे गेली दोन वर्षे हा प्रकल्प लांबणीवर पडला होता. या वर्षीही पावसाळ्यापूर्वी मध्य रेल्वेचे परिवर्तनचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेने परिवर्तन हाती घेतले आहे. या कामासाठी मुख्य सुरक्षा आयुक्त (सीआरएस)कडून परवानगी मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. ती अडचण दूर झाल्याने ‘मरे’ने पावसाळ्यापूर्वीचा शनिवार निवडला आहे. या वेळी २५०० डीसीवरून २५,००० एसी प्रवाह करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर विशेष मेगाब्लॉक
या विद्युत परिवर्तनासाठी शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे ‘मरे’वरील शेवटची लोकल १२ वाजता सोडण्यात येईल. त्यामुळे रात्री शेवटची लोकल पकडणाऱ्या प्रवाशांना रात्री १२ पूर्वीच्या लोकल पकडाव्या लागतील. मध्यरात्री १२ पूर्वी ११.५९ ठाणे धीमी, ११.५२ अंबरनाथ धीमी, ११.४६ टिटवाळा अशा काही लांब मार्गावरील लोकलचा पर्याय प्रवाशांना राहिला आहे. १२ नंतर मेगाब्लॉक सुरू झाल्यावर १२.०५ची अंबरनाथ धीमी, १२.१०ची कसारा धीमी, १२.२३ची ठाणे धीमी, १२.३०ची कर्जत धीमी या गाडय़ा धावणार नाहीत. त्याचप्रमाणे पहाटे ६ वाजेपर्यंत काम आणि चाचण्या सुरू राहिल्यास रविवारीही लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. रविवारी सुट्टीचा दिवस गृहीत धरून रेल्वेने वेळापत्रक आखल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट  केले. या पर्वितनाचे काम वेळेपूर्वीच संपल्यास पहाटे ६ च्या आत लोकल सोडण्यात येणार आहेत.
वेगमर्यादा काढणार!
 ‘मरे’वरील नऊ ठिकाणी गाडय़ांचा वेग केवळ १५ किमी प्रतितास इतका कमी करण्याचे धोरण घेण्यात आले आहे. परिवर्तनानंतर त्यापकी चार ठिकाणच्या वेगमर्यादांचे बंधन कायमस्वरूपी काढण्यात येणार आहेत. त्यात, हँकॉक पुलाकडे वेगमर्यादा कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर करीरोड, टिळकपूल, चिंचपोकळी जवळील गार्डन पूल, सँडहर्स्ट रोडजवळील पुलाकडील वेगमर्यादेचे बंधन काढण्यात आले आहे. इतर सीएसटीच्या टोकाकडील (वायडक्ट पूल), माटुंगा कार्यशाळेजवळील पूल, कुर्लाजवळील कसाईपाडा पूल, भायखळ्याकडील ट्रम्प पुलाकडील मर्यादा टप्प्याटप्प्याने कमी केली जाणार आहे.
शुक्रवारीही मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडले
मध्य रेल्वेच्या डीसी-एसी परिवर्तनाला शनिवार रात्रीचा मुहूर्त मिळाला असला, तरी आदल्या रात्री शुक्रवारीही मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडलेलेच होते. सकाळपासूनच वेळेपेक्षा उशिरा धावणाऱ्या लोकलला रात्री डोंबिवली येथे सिग्नलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ग्रहण लागले. त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ांना उशीर होऊ लागला. परिणामी मध्य रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक बिघडले आणि त्यामुळे कार्यालयातून घराकडे धाव घेणाऱ्या मुंबईकरांना स्टेशनवर खोळंबून राहावे लागले. कुठलीच गाडी धड चालत नसल्याने सीएसटीला रात्री नऊच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती.