मुंबई पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली मरिन ड्राईव्हवरील खुली व्यायामशाळा बेकायदा असल्याचा समज झाल्याने पालिकेच्या ‘सी’ वॉर्डमधील अधिकाऱयांनी गुरुवारी सकाळी त्यावर कारवाई केली. मात्र, रस्त्यावर ही व्यायामशाळा उभारण्यासाठी रितसर परवानगी घेतली असल्याचे निदर्शनास आल्यावर ती पुन्हा आहे त्या जागी उभारण्यात आली. कोणतीही शहानिशा न करता अवघ्या काही तासांमध्ये व्यायामशाळा काढण्याची आणि पु्न्हा आहे त्या जागी उभारण्याची नामुष्की यामुळे पालिका अधिकाऱयांवर ओढवली. तर दुसरीकडे या विषयावरून ट्विटरवर अनेकांनी आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारल्याने त्याला उत्तरे देण्याची वेळ त्यांच्यावर आली.
मरिन ड्राईव्हवर फिरायला येणाऱयांना सहज व्यायाम करता यावा, यासाठी तिथे छोटी व्यायामशाळा उभारण्यात आली होती. या व्यायामशाळेचे उदघाटन आदित्य ठाकरे, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, दिनो मोरिआ यांच्या हस्ते करण्यात आले होते. पालिकेकडून यासाठी रितसर परवानगीही घेण्यात आली होती. मात्र, ‘सी’ वॉर्डमधील अधिकाऱयांनी या परिसरातून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ होत असल्याने या व्यायामशाळेवर गुरुवारी सकाळी कारवाई केली आणि ती काढून टाकण्यात आली. मात्र, त्यानंतर अनेकांनी बेकायदा व्यायामशाळेचे उदघाटन केल्यावरून आदित्य ठाकरे यांना ट्विटरवर प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. त्याला उत्तर देताना केवळ गैरसमजुतीतून ही व्यायामशाळा काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या व्यायामशाळेसाठी पालिकेने परवानगी दिली आहे. मात्र, ‘सी’ वॉर्डमधील अधिकाऱयांना त्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांनी यावर कारवाई केल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने ही कारवाई केल्याबद्दल पालिका अधिकाऱय़ांनी माफी मागितली असल्याचेही त्यांनी ट्विटरवर सांगितले.