मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत नेहमीप्रमाणे पाणी प्रश्न पेटू लागला आहे. दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेत्यांच्या विभागातच पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे स्थायी समितीच्या मंगळवारच्या सभेत पाणीप्रश्नावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. कामगारांच्या बदलीवरून राजकारण करीत अभियंत्यांनी षडयंत्र रचून पाणी कापल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. सर्वच नगरसेवकांनी त्यांच्या या मुद्दय़ाला पािठबा दिल्यामुळे पाणीपुरवठय़ावरून नगरसेवक विरूद्ध अधिकारी असा संघर्ष टिपेला पोहोचण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव पावसाळय़ात काठोकाठ भरलेले असले तरी अनेक भागात अघोषित पाणीकपात सुरू झाली आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय व्यक्ती एकमेकांविरुद्ध कुरघोडय़ा आणि कटकारस्थाने केली जातात हे सर्वश्रृत आहे. पण आता अभियंत्यांनी नगरसेवकांना धडा शिकवण्यासाठी पाणी कापल्याचा गंभीर आरोप होऊ लागला आहे. स्थायी समितीच्या मंगळवारच्या बैठकीत रवी राजा यांनी याबाबत या विषयाला वाचा फोडली. या विषयावर काहीच उत्तर न मिळाल्यास सभात्याग करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी आपापल्या विभागात पाणीकपात झाल्याचा व त्यावर अभियंते व अधिकारी काहीच तोडगा काढत नसल्याचा आरोप केला. वादळी चर्चेनंतर झटपट सभा तहकूब करून कामकाज संपविण्यात आले.

विरोधी पक्षनेत्यांच्या मुद्दय़ाला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वेळीच चाप लावायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली. तर पाणीखात्यात किती कर्मचारी अधिकारी वर्षांनुवर्षे एकाच कार्यालयात आहेत त्यांची माहिती सादर करावी, तसेच या प्रकरणी प्रशासनाने आपली भूमिका  स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

प्रकरण काय? शीव, वडाळा परिसराचा भाग असलेल्या एफ उत्तर वॉर्डातील एका कर्मचाऱ्याला मलबार हिल विभागात पाठवण्यात आले. त्याचे नाव एफ उत्तर परिसरात असूनही त्याला दुसऱ्या विभागात पाठवण्यात आल्यामुळे त्याबाबत रवी राजा यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे या विभाग कार्यालयातील पाणी खात्यातील अभियंत्यांनी एकत्र येऊन आपल्या प्रभागातील पाणीपुरवठा कमी केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, मुख्य जलअभियंता, उपमुख्य जलअभियंता यांच्याकडे तक्रार करूनही तोडगा काढण्यात आलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राजा यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.