मुंबईसह देशात खळबळ उडवून देणाऱ्या शीना बोरा या तरुणीच्या हत्येप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने शुक्रवारी आरोपी संजीव खन्ना याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संजीव खन्नाकडून पोलीसांनी दोन पासपोर्टही जप्त केले आहेत.
संजीव खन्ना याला मुंबई पोलीसांच्या ताब्यात देण्यासाठी कोलकातामधील न्यायालयाने गुरुवारी ट्रान्झिट रिमांड मंजूर केला होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी त्याला पोलीस कोठडीसाठी मुंबईतील न्यायालयात दाखल करण्यात आले. शीना बोरा हिच्या हत्येसाठी कोणती गाडी पुरवण्यात आली. हत्येसाठी काय साहित्य वापरले, ते सुद्धा जप्त करायचे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. संजीव खन्ना याला जास्तीत जास्त दिवसांची कोठडी देण्याची मागणीही करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
२४ एप्रिल २०१२ रोजी वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाजवळून शीनाचे अपहरण करण्यात आले होते. गाडीत वाहनचालक श्याम राय, संजीव खन्ना होते. गळा दाबून हत्या करण्यापूर्वी त्यांनी शीनाला गुंगीचे इंजेक्शनही दिले होते. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून गाडीतच रात्रभर ठेवला. दुसऱ्या दिवशी पेण येथील जंगलात सुटकेस फेकून जाळून टाकण्यात आली होती, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी आणि वाहनचालक श्याम राय यांना यापूर्वीच अटक केली आहे.