One Avighna Park Fire : पाण्याचा दाब, हवेचा वेग, फायर लिफ्ट…मुंबईच्या वन अविघ्नसारख्या उंच इमारतीतील आग विझवण्यातल्या अडचणी!

वन अविघ्न इमारतीच्या १९व्या मजल्यावर लागलेली आग विझवण्यात उंचीमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

fire in lower parel

मुंबईच्या वन अविघ्न इमारतीमध्ये आज दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर आग लागली. अग्निशमन विभागाकडून लेव्हल चारचा अलर्ट देण्यात आल्यामुळे आगीचं स्वरूप गंभीर असल्याची बाब समोर आली. यादरम्यान अग्निशमन विभागाच्या जवळपास २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, अग्निशमन विभागाच्या फायर पंप्सला मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. १९व्या मजल्यावर लागलेली ही आग विझवण्यासाठी पाण्याचा फवारा दिला जात असताना हा फवारा फक्त त्या मजल्याच्या गॅलरीपर्यंतच पोहोचत असल्याचं दृश्यांमधून दिसून आलं. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागासमोर इतक्या अडचणी का उभ्या राहिल्या याची कारणं इमारतींच्या बांधकाम पद्धतीत आणि अग्निशमन विभागाच्या यंत्रसामग्रीमध्ये आहेत.

माजी अग्निशमन अधिकारी प्रताप करगुप्पीकर यांनी यासंदर्भात एबीपीशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. यानुसार, वन अविघ्न इमारतीची उंची जास्त असल्यामुळे अशा ठिकाणी शिडीपेक्षाही जास्त उंचीच्या ठिकाणची आग विझवण्यात अडचणी येतात. त्यामुळेच वन अविघ्न इमारतीमध्ये १९व्या मजल्यावर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाची शिडी फक्त १८व्या मजल्यापर्यंतच पोहोचू शकली. त्यासाठी पाण्याचा मारा करताना फक्त गॅलरीपर्यंतच पाणी पोहोचू शकत असल्याचं दिसून आलं.

हवेचा वेग आणि दिशाही महत्त्वाची

साधारणपणे उंचावर लागणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये जास्त उंचीची शिडी घेतली, तरी हवेच्या वेगावर तिची परिणामकारकता अवलंबून असते. ७० मीटरची शिडी १८व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते, १०० मीटरची शिडी साधारणपणे २१व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकते. मात्र, इतक्या उंचीवर जर हवेचा वेग जास्त असेल, तर या शिडी आपोआप बंद होतात. त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिक सेन्सर्स बसवलेले असतात. त्यामुळे जास्त उंचीवर देखील आग विझवण्यासाठी पोहोचणं कठीण होऊन जातं. वन अविघ्न इमारतीवर १८व्या मजल्यापर्यंत अग्निशमन दलाची शिडी पोहोचू शकली.

फायर लिफ्टचा वापर आवश्यक

करगुप्पीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा उंच इमारतींमध्ये फायर लिफ्ट बसवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. जगभरात हीच पद्धती वापरली जाते. या पद्धतीनुसार अशा फायर लिफ्टमधून आग लागलेल्या मजल्यापर्यंत पोहोचून आतून ही आग विझवावी लागते. अशा आगी या बाहेरून विझत नसून आतल्या बाजूनेच त्याच विझवाव्या लागतात.

घरांचा मोठा आकार ही देखील अडचण!

अलिकडच्या काळात मोठ्या आकाराचे फ्लॅट्स बांधले जातात. यामध्ये २०००, २५०० चौरस फूटांचे किंवा ड्युप्लेक्स, ट्रिप्लेक्स फ्लॅट असतात. अशा घरांमध्ये आग लागल्यास ती लवकर नियंत्रणात न येता आतल्या आत धुमसत राहाते. यासाठी अशा घरांमध्ये अद्ययावर अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणं आवश्यक आहे.

इमारतींची फायर ब्रिगेड यंत्रणा सक्षम असणं आवश्यक

दरम्यान, अशा इमारतींमध्ये वापरण्यात आलेली सामग्री ही अग्निरोधक असायला हवी, जेणेकरून आग लागल्यास ती पसरण्याचा धोका कमी होतो. शिवाय, इमारतीची स्वत:ची फायर ब्रिगेड यंत्रणा कार्यक्षम आणि कार्यरत असणं आवश्यक आहे. इमारतीत फायर पंप, स्प्रिंकलर अशा यंत्रणा आवश्यक आहेत.

One Avighna Park Fire Video: जीव वाचवण्यासाठी गॅलरीला लटकला, पण हात सुटला अन् प्राण गमावला

उंच इमारतीत कशी विझवणार आग?

वन अविघ्न इमारतीतील आग विझवण्यात उंचीमुळे अडचणींचा सामना करावा लागला. अग्निशमन दलाकडचे फायर पंप साधारणपणे ६० मीटरपर्यंत पाण्याचा फवारा पोहोचवू शकतात. त्यावर आगीची उंची असेल, तर तिथे दुसरे पंप जोडून पाण्याचा पोहोच अधिक उंचीपर्यंत वाढवावा लागतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai fire in lower parel one avighna park building 19th floor update pmw

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या