मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात मिळून सोमवारी ११.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. सातही धरणात मिळून सध्या केवळ २५ जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठा वापरण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाच्या कोटय़ातील अतिरिक्त राखीव पाणीसाठा देण्यास पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. जूनमध्ये पाऊस न पडल्यास मुंबईकरांची भिस्त राखीव कोटय़ातील पिण्याच्या पाण्यावर असणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊध्र्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणांत मिळून सध्या केवळ ११.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत पाणीसाठा पुरवावा लागणार आहे. मात्र सध्या असलेला पाणीसाठा हा केवळ २५ जूनपर्यंत पुरेल इतकाच आहे. सात धरणांतून मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्षलिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पावसाला सुरुवात होऊन पुरेसा पाऊस धरणक्षेत्रात पडेपर्यंत वेळ लागणार आहे.




राज्य सरकारची मंजुरी
पावसाला सुरुवात झाल्यानंतर पाण्याची पातळी वाढायला लागेपर्यंत पाणी पुरवावे लागणार आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिका प्रशासनाने भातसा व ऊध्र्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यासाठी राज्य सरकारला आधीच पत्र पाठवले होते. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्यासाठी मंजुरी दिली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा कमालीचा घटला आहे.