scorecardresearch

शिवाजी पार्क हिरवेगार होणार !

शिवाजी पार्क मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मोठय़ा संख्येने मुले येत असतात

७३ हजार २०० चौरस मीटर क्षेत्रफळावर गवताचा गालिचा, पर्जन्य जलसंचय यंत्रणेद्वारे पाणी

मुंबई : दादरसारख्या मध्यवर्ती भागात असलेले शिवाजी पार्कचे मैदान लवकरच कात टाकणार आहे. मैदानातून सतत उडणाऱ्या धुळीच्या आसपासच्या वसाहतींतील रहिवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन पालिकेने येथे मैदानभर गवताचा गालिचा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मैदानातच उभारण्यात आलेल्या वर्षां जलसंचय यंत्रणेद्वारे या गवताचे संवर्धन करण्यात येत आहे.

शिवाजी पार्क मैदानात विविध खेळ खेळण्यासाठी मोठय़ा संख्येने मुले येत असतात. सकाळ-संध्याकाळी आसपासच्या परिसरातील रहिवासी फेरफटका मारण्यासाठी मैदानात येतात. मैदानात होणारे क्रिकेटचे सामने आणि अन्य खेळांमुळे मोठय़ा प्रमाणावर धूळ उडत असते. या धुळीमुळे मैदानाच्या आसपास वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना प्रचंड त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी मनसेने पुढाकार घेत मैदानात वर्षां जल संचयन प्रकल्प उभारला होता.त्यामुळे काही काळ धुळीचा त्रास बंदही झाला होता. देखभालीअभावी या प्रकल्पाची वाताहात झाली आणि पुन्हा धुळीचा त्रास वाढू लागला. त्यामुळे पालिकेने याठिकाणी नव्याने पर्जन्य जलसंचय यंत्रणा उभारली आहे.

पालिकेच्या जी उत्तर विभागाने ९८ हजार २४० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या मैदानात ३६ कूपनलिका खोदून मैदानात सक्षम असा वर्षां जलसंचयन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. तसेच ७३ हजार २०० चौरस मीटर क्षेत्रफळावर गवताचा गालिचा निर्माण करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. जुने स्प्रिंकलर, तसेच वाहिन्यांची दुरुस्ती करून त्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मातीची भरणी करून मैदानातील असमान भाग समतोल करण्यात आला आहे.

प्रकल्पावर चार कोटी रुपये खर्च

या प्रकल्पासाठी सुमारे ६ कोटी रुपये अंदाजित खर्च निश्चित करण्यात आला होता. मात्र खर्चाच्या अंदाजात सुधारणा करून तो ३ कोटी ६० लाख रुपये असा निश्चित करण्यात आला होता. आतापर्यंत सुमारे चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. 

तोरस्ता नव्हे, मातीचा पट्टा

या मैदानात माँसाहेब मीनाताई ठाकरे स्मारक आणि उद्यान गणेश मंदिर दरम्यान पाण्याचा निचरा करण्यासाठी मातीची मार्गिका उभारण्यात येत असून या मार्गिकेसाठी डांबर, खडीचा वापर करू नये अशी मागणी करीत स्थानिक रहिवासी आणि मनसेने विरोध केला होता. मात्र, मैदानात असा रस्ता तयार करण्यात येत नसल्याचे पालिकेने सांगितले. या मार्गिकेसाठी तीन-चार फूट खाली खडीचा थर टाकण्यात येणार असून त्यावर जिओ सिंथेटिक कागद अंथरण्यात येणार आहे. त्यावर मातीचा पट्टा असेल. यामुळे पावसाच्या पाण्याने माती वाहून जाणार नाही आणि पावसाचे पाणी र्पजन्य जलवाहिनीच्या माध्यमातून कूपनलिकांमध्ये साठेल, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नागरिकांची धुळीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. मैदानात उंच-सखल भाग होता. मातीचा भरणा टाकून मैदान समतोल करण्यात आले आहे. आता प्रतिदिन ३ लाख ५० हजार लिटर पाणी उपलब्ध झाले असून या पाण्यामुळे मैदानात हिरवळ कायम राहील.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी-उत्तर विभाग

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai municipal corporation started making grass carpets on shivaji park ground zws

ताज्या बातम्या