काही पावलांवर रेल्वे असताना एखाद्या व्यक्तीला वाचवतानाचा प्रसंग अनेक वेळा तुम्ही पाहिला असेल. ज्याला लोकल गती माहिती आहे, त्याला तर हे अविश्वसनीयच वाटतं. पण, अशीच घटना मुंबईत घडली आहे. पोलिसांने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडणारी व्यक्ती मरणाला हुलकावणी देऊन सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मवर पोहोचली. पण, त्या व्यक्तीच्या मुर्खपणाने संतापलेल्या पोलिसांचा मात्र, संयम सुटला आणि पोलिसांने त्या व्यक्तीला केलेल्या चुकीची जाणीव करून दिली.

सोशल मीडियावर मुंबईतील दहिसर रेल्वे स्थानकावरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक ६० वर्षांची व्यक्ती रेल्वे ट्रॅक ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्म जात होती. मात्र, जात असताना अचानक रेल्वे ट्रॅकमध्ये व्यक्तीचा पाय अडकला. तिने झटका देऊन पाय काढला. पण बूट निघाला. त्यामुळे व्यक्तीने बाजूला जाऊन पायात बूट घातला. यावेळी लोकल रेल्वे अगदी काही पावलांवर आली होती.

लोकल जवळ आलेली असताना ही व्यक्ती रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या तयारीत असल्याचं प्लॅटफॉर्मवरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं. पोलिसांने त्याच्याकडे धाव घेतली. तोपर्यंत रेल्वे दोन चार पावलांवर आलेली होती. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तीला जागेवरच रेल्वे ट्रॅकच्या बाजूला थांबवण्याचा इशारा केला.

पोलीस ओरडत असतानाही त्याकडे व्यक्तीने दुर्लक्ष केलं. त्यानंतर लोकल किती अंतरावर आहे याचा अंदाज न घेता रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचं धाडस केलं. रेल्वेखाली सापडण्याची भीती वाटत असतानाच पोलिसाने प्रसंगावधान दाखवत त्या व्यक्तीला ताकदीने खेचलं आणि सुरक्षितपणे प्लॅटफॉर्मकडे ओढलं. डोळ्याची पापणी लवते न लवते इतक्या कमी वेळात हा थरार घडला. त्या व्यक्तीनं केलेल्या जीवघेणा धाडसामुळे पोलिसांचा संयम सुटला आणि त्याने व्यक्तीला चापट मारली. मात्र, पोलिसाने वेळीच धाव घेतली नसती, तर त्या व्यक्तीला जिवाला मुकावं लागलं असतं. हा सगळा प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.