मुंबई : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूर असल्याचा प्रमुख आरोप पोलिसांनी दाखल केलेल्या ९०५ पानी आरोपपत्रात करण्यात आला आहे.  दरेकर हे बोगस मजूर असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. या वृत्ताची दखल घेत मुंबई विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र घोषित केले. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केली. त्यानंतर माता रमाबाई मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी ३८  व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी २४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. यामध्ये काही मजुरांचा समावेश आहे. मजूर म्हणून सदस्य असले तरी प्रत्यक्ष काम करताना आम्ही दरेकर यांना कधीही पाहिले नाही. २०१७-१८ मध्ये त्यांची सुपरवायझर म्हणून नोंद असली तरी ते कधीही तपासणी करण्यासाठी आले नाहीत, अशी साक्ष नोंदविण्यात आली आहे. २०१७ मध्ये दरेकर यांना मजुरीपोटी २५ हजार ७५० रुपये मिळाल्याची नोंद आहे. पण ११ डिसेंबर २०१७ मध्ये ते नागपूर येथे अधिवेशनात हजर होते. मात्र मजुरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली, असा आरोप ठेवण्यात आला आहे. एका वरिष्ठ बँक अधिकाऱ्याचीही साक्ष नोंदविण्यात आली आहे. २०१५ ते २०२० या काळात दरेकर यांना १८ लाख १३ हजार इतका इंधन भत्ता देण्यात आला, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रतिज्ञा मजूर संस्थेचे आजी व माजी अध्यक्ष श्रीकांत कदम तसेच प्रवीण मर्गज यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. आपल्या मित्राच्या घराचा पत्ता प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचा पत्ता म्हणून देण्यात आल्याची बाबही नमूद करण्यात आली आहे.