गेल्या महिन्याभरात रेल्वे प्रवासात गाडीत विसरलेल्या ११ लाख ४५ हजारांच्या वस्तू रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना परत केल्या आहेत. यात भ्रमणध्वनी, लॅपटॉप, सोन्याचे दागिने आदी वस्तूंचा समावेश आहे. यासाठी रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर १०२८ तक्रारी नोंदवण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे पोलिसांनी ९८३३३३११११ हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. यात रेल्वे प्रवासात वस्तू विसरण्यासह अपघात आणि वैद्यकीय मदतीसाठी ७०, संशयित व्यक्तीबाबत १४, हरविलेल्या व्यक्तींसाठी ३०, महिला आणि अपंगाच्या राखीव डब्यातून प्रवास केल्याप्रकरणी १०७ प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत ३६ पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष कामगिरीसाठी त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
प्रवाशांच्या रेल्वे गाडीत विसरलेल्या वस्तू रेल्वे पोलिसांना मिळताच, त्या न्यायालयात दाखल करून त्यांची नोंद केली जाते. त्यानंतर प्रवाशांची चौकशी करून त्यांना त्या वस्तू सोपवल्या जातात, असे रेल्वे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी वस्तू विसरल्यास रेल्वे पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी, असे सांगण्यात आले.