मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा कमी होऊ लागल्याने मुंबईकरांची जलचिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून केवळ २७ टक्के पाणी शिल्लक असून जूनअखेपर्यंतच हे पाणी पुरणार आहे. यंदाही पावसाने ओढ दिल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. दुसरीकडे राज्यात आणि देशातही पाणीसाठा ३५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

मुंबईला उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ३,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. सातही धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. रविवारी उर्ध्व वैतरणा धरणात ३६.६० टक्के, मोडकसागरमध्ये २४.९७ टक्के, तानसामध्ये ४१.८६ टक्के, मध्य वैतरणामध्ये १२.१३ टक्के, भातसामध्ये २६.३४ टक्के, विहारमध्ये ३९.६१ तर तुळशीमध्ये ४४.२० टक्के साठयाची नोंद झाली. सातही धरणांमध्ये सरासरी केवळ २७.८१ टक्के पाणीसाठा आहे. ७ एप्रिल २०२३ रोजी ३३.९० टक्के तर २०२२ मध्ये ३६.७६ टक्के पाणीसाठा होता.  भांडुप जलशुद्धीकरण केंद्राच्या परिरक्षण कामांमुळे शहरात १५ टक्के पाणीकपात होत असताना सातत्याने घटत चाललेल्या पाणीसाठयामुळे चिंतेत भर पडली आहे. 

हेही वाचा >>> राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी

राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा ३५.८८ टक्क्यांवर आला आहे. सर्वात कमी म्हणजे १८.३१ टक्के पाणीसाठा औरंगाबाद विभागात आहे. देशातील सरासरी पाणीसाठाही ३५ टक्क्यांवर असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली.

महाराष्ट्रात शहरांची संख्या जास्त आहे. त्यामुळे धरणांतील पाणी शहरांकडे वळविले जाते. दीर्घकालीन पाणी नियोजन करायचे असल्यास उपलब्ध पाणी आणि पिकांचे नियोजन करण्याची गरज आहे. भूजल उपशावर देशभरात ठोस नियंत्रण नाही. – गुरुदास नूलकर, जलतज्ज्ञ

बिहारमध्ये भीषण स्थिती

* चार एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशांतील मोठया १५० प्रकल्पांमध्ये एकूण क्षमतेच्या ३५ टक्के पाणीसाठा आहे.

* सरासरी तापमान ३८ ते ४० अंशांवर गेले असून पाणीटंचाईही गंभीर होऊ लागली आहे. उत्तरेकडील अन्य राज्यांच्या तुलनेत बिहार भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. बिहारमधील धरणांत अवघा सात टक्के पाणीसाठा आहे.

* दक्षिणेकडील राज्यांत २० टक्के पाणीसाठा असून, तो सरासरीपेक्षा २८ टक्के कमी आहे.