लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : रखडलेल्या गृहप्रकल्पांमुळे बेघर झालेल्या खरेदीदारांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या परवडणारी व मध्य उत्पन्न गटाच्या गृहनिर्माणासाठी गुंतवणूक निधीमुळे (स्वामीह निधी) आतापर्यंत राज्यातील आठ गृहप्रकल्प पूर्ण झाले असून रहिवाशांना घरांचा ताबा मिळाला आहे. या निधीतून मिळालेल्या संपूर्ण रकमेची विकासकांनी परतफेडही केली आहे.

देशभरातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये हा निधी स्टेट बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिला. देशभरात आतापर्यंत १३० प्रकल्पांना १२ हजारहून अधिक कोटींचा निधी वितरित झाला आहे. त्यापैकी ४६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत वितरित रकमेपैकी २५ टक्के रक्कम निधीत परत आली आहे, असे स्टेट बँकेच्या स्वामीह निधी विभागाकडून सांगण्यात आले. राज्यातील पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये पुण्यातील एक व इतर सात प्रकल्प मुंबई महानगरातील आहेत. हे प्रकल्प निधीअभावी रखडले होते.

आणखी वाचा-मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली

स्वामीह निधी मिळविण्यासाठी प्रकल्प बराच काळ निधीअभावी रखडला असल्याचे सिद्ध करावे लागते. याशिवाय ९० टक्के चटईक्षेत्रफळ हे परवडणारी वा मध्य उत्पन्न गटातील घरांच्या उभारणीसाठी वापरणे बंधनकारक असते. याशिवाय विक्रीसाठी असलेल्या घरांची किंमत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीपेक्षा अधिक असणे आवश्यक असते. प्रकल्पाचे ३० टक्के काम पूर्ण झालेले असले तरच हा निधी मिळतो. रेराअंतर्गत नोंदणी हीदेखील हा निधी मिळविण्यासाठी प्रमुख अट आहे.

पूर्ण झालेले प्रकल्प (कंसात प्रकल्प सुरू झाल्याचे वर्ष)

  • रावळी पार्क, बोरिवली पूर्व : सीसीआय प्रोजेक्ट (२०१०) फेब्रुवारी २०२० मध्ये स्वामीह निधीतून १२३.३ कोटी वितरित. ६८३ खरेदीदादारांना घरांचा ताबा
  • लोढा अप्पर ठाणे : लोढा समूह, मॅक्रोटेक डेव्हलपर्स (२०१८) स्वामीह निधीतून ७५ कोटी वितरित, ११६५ खरेदीदारांना घरांचा ताबा
  • जेम पॅराडाईज, डी एन नगर, अंधेरी पश्चिम : वायुपुत्र बिल्डर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा. लि. (२०१४) २०२१ मध्ये स्वामीह निधीतून १२ कोटी वितरित, ६७ खरेदीदारांना घरांचा ताबा.
  • एम के गॅबिनो, आंबोली, अंधेरी पश्चिम : ए आर आंबोली डेव्हलपर्स प्रा. लि. (२०१८) २०२० मध्ये स्वामीह निधीतून २५ कोटी वितरित, १०५ खरेदीदारांना घरांचा ताबा.
  • नेवा भक्ति पार्क, ऐरोली : नेवा टेक्नॉलॉजी प्रा. लि. (२०१७) २०२० मध्ये स्वामीह निधीतून २० कोटी वितरित. १०८ खरेदादारांना घरांचा ताबा.
  • अप्पर ईस्ट ९७, अप्पर गोविंद नगर, मालाड पूर्व : प्रायमा टेरा बिल्डटेक, (२०१५) निधीअभावी प्रकल्प रखडला. २०२१ मध्ये स्वामीह निधीतून ३२ कोटी वितरित. १२९ खरेदीदारांना घरांचा ताबा.
  • विंडस्पेस अमेलिओ, डी. एन. नगर, अंधेरी पश्चिम : बिनी बिल्डर्स प्रा. लि., (२०११) प्रकल्प रखडला. स्वामीह निधीतून २६ कोटी वितरित, ४० खरेदीदारांना घरांचा ताबा.
  • कल्पक होम्स, किरकटवाडी, पुणे : बेलवलकर ग्रुप (शुभांकर कल्पक बिल्डर्स प्रा. लि.) (२०१६) निधीअभावी प्रकल्प अडकला. स्वामीह निधीतून १२.५ कोटी वितरित, १२१ खरेदीदारांना घरांचा ताबा.