“करोनाची तिसरी लाट आधीच आली आहे,” मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची माहिती

देशात करोना दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे.

Mayor-Corona
तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावरून महापौर किशोरी पेडणेकरांचा यू-टर्न

देशात करोना दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. गर्दी होणार नाही यासाठी अजूनही अनेक निर्बंध लागू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही करोना रुग्ण वाढले तर पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं स्पष्ट केलं आहे. त्यातच करोनाची तिसरी लाट आधीच आली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. दरम्यान मुंबईत सोमवारी ३७९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली होती. तर ४१७ रुग्णांनी करोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मुंबईत आतापर्यंत ७ लाख २४ हजार ४९४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर ३ हजार ७७१ सक्रिय रुग्ण आहेत. करोना दुप्पटीचा दर १२९० दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर करोना रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका होता.

“माझं घर माझा बाप्पा, माझं मंडळ माझा बाप्पा अशी संकल्पना आणली आहे. माझ्या गणपतीला सोडून कुठेही जाणार नाही. यामुळे लोकं इकडे तिकडे फिरणार नाही. बिना मास्कचे तिथे बसणार नाही. मंडळातील सदस्यही जबाबदारी घेत आहेत. मी कुठेच जाणार नाही. तिसरी लाट येणार आहे, असं नाही. आली आहे.” असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

मुंबईत करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता गेल्या आठवड्यात काही सूचना करण्यात आल्या आहेत. एखाद्या इमारतीत पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत सील केली जाणार आहे. सील केलेल्या इमारतीच्या गेटवर पोलीसही तैनात केले जाणार आहेत. तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्याचं ठरवण्यात आलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai third wave corona wave says mayor kishori pednekar rmt