ताशी १६० ते २०० किलोमीटपर्यंत वेग वाढणार; अर्थसंकल्पात प्रस्तावाला मंजुरी

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न बाळगले असतानाच मुंबई ते दिल्ली प्रवासही अतिजलद करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने समोर ठेवले आहे. या मार्गावरील वेग प्रति तास १३० किलोमीटरवरून १६० ते २०० किलोमीटपर्यंत केला जाणार असून दिल्लीपर्यंत राजधानी एक्स्प्रेसचा होणारा १६ तासांचा प्रवासही १२ तासांत शक्य होईल. गेल्या काही महिन्यांपासून नुसतीच चर्चा होणाऱ्या या प्रस्तावाला यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

मुंबई ते दिल्ली मार्गावर सध्याच्या घडीला सुमारे ३० मेल-एक्स्प्रेस धावतात. यामध्ये तीन राजधानी गाडय़ाही आहेत. १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबई ते दिल्ली मार्गावर तिसरी राजधानी विशेष ट्रेन सुरू करण्यात आली. दोन राजधानी गाडय़ांना १६ तास लागत असतानाच सुरू केलेल्या विशेष ट्रेनला मात्र १४ तास लागत आहेत. ५,४०० क्षमतेचे दोन लोकोमोटिव्ह जोडून ही गाडी चालविण्यात आली आहे; परंतु १२ तासांपर्यंत प्रवास वेळेचे उद्दिष्ट ठेवण्यासाठी या मार्गावरील यंत्रणाच रेल्वेला बदलावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

मुंबई ते दिल्ली मार्गावरील प्रवास वेळ १२ तासांपर्यंत करण्याचा प्रस्ताव तयार करून तो रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाचा अर्थसंकल्पात समावेश करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच एक लाख रुपयांची तरतूदही करून प्रस्ताव पुढे सरकवण्यास हातभार लावला आहे. पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी मुंबई ते दिल्ली मार्गावरील वेग वाढविण्याच्या प्रस्तावाचा अर्थसंकल्पात समावेश करून त्याला मंजुरी मिळाल्याचे सांगितले. यानंतर पाहणी केली जाणार असून रुळांची क्षमता वाढवितानाच, सिग्नल, ओव्हरहेड वायर, पुलांची दुरुस्ती यासाठी संरक्षक भिंत, इत्यादींचीही कामे करावी लागणार आहेत. त्यानंतरच या मार्गावर ताशी १६० किलोमीटर ते २०० किलोमीटर एवढय़ा वेगाने गाडय़ा धावू शकतात, असे जैन यांनी सांगितले.

राजधानी गाडीसाठी ताशी १३० किलोमीटपर्यंत वेगाची मंजुरी आहे; परंतु मुंबई ते दिल्ली मार्गावर अनेक ठिकाणी असलेली वेगमर्यादा, वळणदार मार्ग इत्यादींमुळे हा वेग जास्तीत जास्त १०० किंवा ११० पर्यंत जातो. तर राजधानीशिवाय अन्य गाडय़ांचा वेगही ताशी १०० पर्यंतच जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वेग वाढविण्यासाठी अनेक तांत्रिक कामे करतानाच जादा क्षमतेच्या इंजिनाचीही गरज लागणार आहे. या प्रकल्पाची व्याप्ती मोठी असल्याने सर्व कामे पूर्ण करण्यासाठी साधारण दोन ते तीन वर्षे लागतील.