मुंबईला नवी मुंबई आणि उरण, न्हावाशेवा परिसराशी जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या शिवडी ते न्हावाशेवा दरम्यानच्या सागरी सेतू प्रकल्पासाठी १९२० कोटी रूपयांचा व्यवहार्यता तफावत निधी देण्यास केंद्रीय वित्तमंत्री पी.चिदंबरम यांनी मंजूरी दिली आहे. नवीन वर्षांच्या आरंभीच महाराष्ट्राच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला १९२० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याने सर्वात मोठे गिफ्ट महाराष्ट्रातील जनतेला मिळाले आहे.  
शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतूची लांबी सुमारे २२ किलोमीटर असेल. देशविदेशातील नामांकित कंपन्यांनी त्यात रस घेतला आहे. सागरी सेतू प्रकल्पात १६.५ किलोमीटरचा प्रत्यक्ष सागरी सेतू असेल तर ५.५ किलोमीटर लांबीचा मार्ग हा किनारपट्टी भागातून सागरातील सेतूवर आणि तेथून नंतर किनारपट्टीवर पूल संपतो तेथपर्यंत असेल. शिवडीहून पूर्वमुक्त मार्गाला जोडणारा आणि चिर्लेहून राष्ट्रीय महामार्ग ‘चार-बी’ला  जोडणारा रस्ताही वाहतूक व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे. या सागरी सेतूसाठी ९६३० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे २० टक्के निधी व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ) म्हणून मिळावा अशी प्राधिकरणाची मागणी होती. त्यानुसार १९२० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यावर स्वाक्षरी केली. निधीची औपचारिकता पूर्ण झाल्याने शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai trans harbour link received central funding of rs 1920 crore
First published on: 18-01-2013 at 06:12 IST