सरसकट दुकाने रात्रभर खुली ठेवण्यास व्यावसायिक प्रतिकूल

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या मध्यरात्रीपासून अमलात येत असलेल्या ‘मुंबई २४ तास’ या संकल्पनेमुळे मुंबई शहर रात्रभर गजबजलेले राहिल, अशी अपेक्षा असली तरी, प्रत्यक्षात सुरुवातीला त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. काही ठराविक रेस्तराँ, हॉटेल चालकांनीच रात्रभर आस्थापने खुली ठेवण्याची जोखीम घेतली आहे. बहुतांश आस्थापने इतरांना लाभणारा प्रतिसाद पाहून यात सहभागी व्हावचे की नाही हे ठरविणार आहेत. त्यामुळे मुंबई २४ तास बाबत सध्या तरी संमिश्र चित्र आहे.

काही मॉलमध्ये ‘मुंबई २४ तास’मुळे उत्साही वातावरण आहे. घाटकोपर येथील आर सीटी मॉलमधील बहुतांश आस्थापने सुरू राहणार आहेत. त्यामध्ये ग्रॅन्डमामाज् कॅफे, स्टारबक्स, फ्रोझन बॉटल, एजंट जॅक्स, टीजीआयएफ, कुकीमॅन, चक इ चिज्, अर्बन तडका, शॉपर्स स्टॉप, ग्लोबस, डिकॅथलॉन आदींचा समावेश आहे. वेळा वाढणार असल्याने मॉलची देखभाल ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये १० टक्क्य़ांनी वाढ करण्यात आली आहे. येथे ‘फॉरेस्ट गम्प’ आणि ‘मिडनाइट इन पॅरिस’ या चित्रपटांचे खेळही आयोजण्यात आले आहेत. ‘मुंबई बदलत आहे याचा आम्हाला आनंद आहे. जगातील इतर शहरांप्रमाणे मुंबईत रात्रभर व्यवहार सुरू ठेवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयोगाबाबत मॉलमधील रिटेल व्यापाऱ्यांशी संवाद साधत आहोत. मॉलमधील सुरक्षा आणि स्वच्छता राखण्यासाठी त्याचबरोबर रहिवाशांना त्रास होऊ नये यासाठी कर्मचारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,’ असे आर सिटी मॉलचे मालक संदिप रुनवाल यांनी सांगितले.

लोअर परळ येथील फिनिक्स मॉलमधील बहुतांश खाद्यपदार्थ आस्थापने मात्र बंदच राहतील, असे चित्र आहे. येथील ‘सोशल बार अ‍ॅण्ड रेस्तराँ’ रात्रभर सुरू राहणार आहे. सध्या ते रात्री दीडपर्यंत खुले असते. नियमानुसार रात्री दीडनंतर मद्यविक्री बंद केली जाईल. त्यानंतर खाद्यपदार्थाची विक्री होणार आहे. येथे रात्रीच्या गरजेनुसार काही नवीन पदार्थ ठेवले जाणार आहेत. मात्र याला पुढील काही दिवस कसा प्रतिसाद मिळतो, यावर २४ तास रेस्तराँ सुरू ठेवायचे की नाही हे ठरवू, असे रेस्तराँच्या चालकाने सांगितले. इथल्या ‘आशिया किचन’च्या चालकाने  कर्मचाऱ्यांअभावी सध्या चोवीस तास सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली. निर्णय चांगला आहे. मात्र, इतरांना मिळणारा प्रतिसाद पाहून निर्णय घेऊ,’ असे येथील व्यवस्थापकाने सांगितले. आस्थापनांची मोठी साखळी असलेले एफबीबी, फूड मॉल, ब्रुक्स ब्रदर्स यांच्या अधिकाऱ्यांनी आस्थापने सुरू ठेवण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

  पोलिस यंत्रणाही सावध

मुंबई २४ तासच्या प्रयोगात शहरातील किती आस्थापना सहभागी होणार, याबाबत गुरुवार संध्याकाळपर्यंत मुंबई पोलिसांकडे नेमकी माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी शहरातील सर्व मॉल चालक आणि आस्थापनांना खासगी सुरक्षाव्यवस्थेसह प्रकाशयोजना, सीसीटीव्हींच्या व्यवस्थेबाबत सूचना दिल्या आहेत. मॉलप्रमाणे बंदिस्त आवारात किंवा एकाच छताखाली हॉटेल, दुकाने आदी विविध प्रकारच्या आस्थापनांचा संच असलेली ठिकाणे २४ तास सुरू राहाणार आहेत. उपक्रमाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण शहरातील सुमारे २५ ठिकाणे सहभागी होतील, अशी माहिती पोलिसांकडे आहे. मात्र याबाबत महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा अन्य यंत्रणांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी मध्यरात्री गर्दी होईल तेथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत गुन्हे घडू नयेत यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहेत. त्यासोबत शहरातील सर्व मॉल आणि अनेक आस्थापना एकाच छताखालील अनेक आस्थापनांचे संच चालविणाऱ्या बंद गिरण्यांच्या व्यवस्थापनांशी चर्चा सुरू आहे. जे मॉल किंवा बंद गिरण्यांचे आवार या उपक्रमात सहभागी होतील त्यांनी आवारात गुन्हे विशेषत: महिलांविरोधी गुन्हे घडू नयेत यासाठी खासगी सुरक्षा व्यवस्था नेमावी.

प्रत्येक टप्प्यावर सीसीटीव्हींची व्यवस्था असावी. बंद पडलेल्या सीसीटीव्हींची डागडुजी करून नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहाण्याच्या सूचना द्याव्यात. याशिवाय आवारात सर्वत्र प्रकाश योजना असावी, अशा सूचना केल्याचे अशोक यांनी सांगितले. प्रायोगिक तत्वावर उपक्रम सुरू होणार असल्याने शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन पोलीस ठाण्यांच्या रात्रपाळीतील बंदोबस्त, गस्तीत वेळपरस्ते बदल केले जाणार आहेत.

चित्रपटगृह रात्री सुरू ठेवणे सोपे नाही

‘मुंबई २४ तास’ यशस्वी करण्यात मनोरंजनाचा मोठा हात असेल. मात्र ‘चित्रपटगृहे रात्री सुरू ठेवण्यासाठी संबंधित मॉलकडे पुरेसे मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. रात्री चित्रपटगृहे सुरू ठेवणे सोपी गोष्ट नाही. कारण रात्री मॉलची देखभाल आणि स्वच्छता केली जाते. आम्ही काही प्राथमिक बाबी पडताळून पाहतो आहोत,’ असे ‘मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे सचिव प्रकाश चाफळकर यांनी सांगितले.

‘मॅक-डी’ रात्री तीनपर्यंत

‘मॅकडोनाल्ड’ या खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या आस्थापनाने मॉलमधील दुकाने रात्री तीन वाजेपर्यंत खुली ठेवण्याचे जाहीर केले आहे. ‘या निर्णयामुळे व्यवसाय वृद्धीला चालना मिळेल. जगभरात अनेक ठिकाणी आमची आस्थापने २४ तास खुली असतात. त्यात त्यांनी यश मिळवले आहे. मुंबईतही याला चांगले यश मिळेल अशी आशा आहे,’ असे मत कंपनीचे वरिष्ठ संचालक सौरभ कालरा यांनी व्यक्त केले.