एटीकेटीची परीक्षा झाल्यानंतर अवघ्या १४ दिवसांतच एमएस्सी गणिताची सत्र परीक्षा

मुंबई विद्यापीठात गणित विषयाच्या पदव्युत्तर पदवीला (एमएस्सी) गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या मागे रखडलेले निकाल, परीक्षा वेळापत्रकातील अनियोजन यामुळे लागलेले शुक्लकाष्ठ यंदाही सुटलेले नाही. अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांला असलेल्या विद्यार्थ्यांची एटीकेटी परीक्षा संपून आठवडा लोटतो न लोटतो तोच येत्या ९ नोव्हेंबरपासून या विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्राच्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.

बीएस्सीच्या निकालाला दरवर्षी होणाऱ्या विलंबामुळे एमएस्सीच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांचे प्रवेश रखडतात. त्यातच गणिताचा अभ्यासक्रम खूप जास्त असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाला फारच कमी वेळ मिळतो. गेल्या वर्षी प्रवेश होऊन दीड महिना होत नाही तोच विद्यापीठाने परीक्षा जाहीर केल्याने अध्यापनाला केवळ ५० दिवसच मिळाले. अखेर विद्यार्थी-प्राध्यापकांनी विरोध करून विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलण्यास भाग पाडले. या वर्षी हे विद्यार्थी एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षांला आहेत. त्यांची एटीकेटीची परीक्षा २५ ऑक्टोबरला संपली. परंतु, लगेचच म्हणजे अवघ्या १४ दिवसात (९ नोव्हेंबरपासून) विद्यापीठाने तिसऱ्या सत्राच्या परीक्षेचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. दरवर्षी मुख्य सत्र परीक्षा झाल्यानंतर एटीकेटीच्या परीक्षा होतात आणि त्यांना किमान महिनाभराचा कालावधी असतो. परंतु, यंदा सगळेच गणित फिस्कटल्याने विद्यार्थी नाराज आहेत.

ऑपरेशनल रिसर्चचे नियोजन कोसळणार

विद्यापीठाने सत्र-३ करिता दिलेल्या वेळापत्रकावर वद्यार्थी समाधानी नाहीत. या वेळापत्रकानुसार ‘ऑपरेशनल रिसर्च’ हा पेपर वगळता प्रत्येक विषयाच्या परीक्षेदरम्यान एक दिवसाची सुट्टी आहे. मात्र, आदल्या दिवशी म्हणजे २२ नोव्हेंबरला ‘न्युमरिकल अ‍ॅनॅलिसिस’ या विषयाची परीक्षा झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबरला ऑपरेशनल रिसर्चची परीक्षा आहे. या सर्व परीक्षा ११ वाजता होणार आहे. त्यामुळे हे नियोजन कसे होणार हा प्रश्न आहे.

जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षा केंद्रापासून दूर राहतात आणि जे दिवसाला तीन-चार तास प्रवास करून केंद्र गाठणार आहेत, त्यांच्या अभ्यासाचे नियोजन तर यामुळे कोसळणारच आहे.

अवघे २५० विद्यार्थी

एकतर अभ्यास जास्त म्हणून गणितात पदव्युत्तर शिक्षण घेण्याकडे फार कमी विद्यार्थ्यांचा ओढा असतो. मुंबई विद्यापीठ, इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, मिठीबाई आणि मॉडर्न महाविद्यालयात मिळून गणित विषयात एमएस्सी करणारे अवघे २५० विद्यार्थी आहेत. परंतु, त्यांचीही प्रवेश, परीक्षा, निकाल ही प्रक्रिया वेळेत पार पाडणे विद्यापीठाला शक्य होत नाही. त्याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या निकालावर होतो आहे. दरवर्षी या विषयाचा निकाल अवघे १२ ते १५ टक्के लागतो आहे.

पुनर्मूल्यांकनाच्या निकालाआधीच पुनर्परीक्षा

अनेक विद्यार्थ्यांना तर सत्र-२च्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विषयाची पुनर्परीक्षा झाली तरी मुंबई विद्यापीठाकडून त्याच्या फोटोकॉपी मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करून उत्तीर्ण होण्याची खातरजमा करणे तर दूरच राहिले. आधीच्या परीक्षेच्या पुनर्मूल्यांकनाआधीच एटीकेटीची परीक्षा द्यावी लागल्यानेही विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाच्या कारभाराबाबत नाराजी आहे.