मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच प्रचारयात्रेमुळे काही काळ मेट्रो सेवा, अनेक ठिकाणचे रस्ते बंद केल्याने मुंबईकरांचा खोळंबा होत होता. तर, सोमवारी मतदानाच्या दिवशी बेस्ट, एसटी, टॅक्सी, रिक्षा सेवा मर्यादित असल्याने मतदारांचे प्रचंड हाल झाले. निवडणुकीच्या कामानिमित्त बेस्ट, एसटी, टॅक्सी, रिक्षाचा वापर केल्याने मतदारांना बराच काळ वाट बघूनही कोणतेही वाहन मिळत नव्हते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणूक सोमवारी पार पडली. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात निवडणूक असल्याने, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान साहित्य, निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी, सुरक्षा विभाग यांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी बेस्ट उपक्रम, एसटी महामंडळावर सोपविण्यात आली होती. यासाठी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघासाठी एसटीच्या १२७, तर बेस्ट उपक्रमाच्या ८२९ बसचे आरक्षण केले होते. अनेक मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांनी रिक्षा- टॅक्सी आरक्षित केल्या होत्या. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर ५० टक्क्यांहून कमी संख्येने रिक्षा-टॅक्सी धावत होत्या. रिक्षा-टॅक्सी थांब्यावरही तुरळक रिक्षा-टॅक्सी दिसत होत्या. त्यामुळे मतदारांची खूपच गैरसोय झाली.

हेही वाचा…बीडीडीवासीय आणि वांद्रे वसाहतीतील रहिवाशांनी बजावला मतदानाचा हक्क

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा उपलब्ध होती. ही सेवा दिव्यांग मतदारांसाठी मोफत होती. मुंबई उपनगरात बेस्टच्या ३८२, तर मुंबई शहरात २१२ अशा एकूण ५९४ बस उपलब्ध करण्यात आल्या. तर, मुंबई शहरात व्हील चेअर असलेल्या १० आणि उपनगरांत २५ अशा एकूण ३५ बस धावल्या. बेस्ट उपक्रमाच्या एकूण ६२९ बस संपूर्ण मुंबईभर धावल्या. तसेच पोलीस प्रशासनासाठी २०० बेस्ट बस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. बेस्ट उपक्रमाच्या एकूण ३ हजार बस ताफ्यातील ८०० बस मतदानाच्या कामानिमित्त धावत होत्या. तर, उर्वरित २,२०० बस मुंबईतील रस्त्यांवर धावत होत्या. मात्र या बस विलंबाने धावत असल्याने बस थांब्यावर गर्दी दिसत होती. राजकीय नेत्यांकडून वांद्रे टर्मिनस येथील १०० रिक्षा आणि ५० टॅक्सी आरक्षित केल्या. या रिक्षा-टॅक्सीचा वापर निर्मलनगर, खेरवाडी येथील मतदारांना मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी केला.

हेही वाचा…मतदानाचा हक्क बजावणे झाले शक्य, मतदानाच्या दिवशी नवमतदारांना मिळाले मतदार ओळखपत्र

मतदानानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे अनेक कार्यालये बंद होती. त्यामुळे चालकांनी टॅक्सी, रिक्षा बंद ठेवणे पसंत केले होते. दळणवळणासाठी वाहन उपलब्ध होत नसल्यामुळे मतदारांचे हाल झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai voters face transportation woes on polling day amid limited services and traffic disruptions mumbai print news psg
Show comments