महापालिकेची अर्थकसरत

करोनामुळे टाळेबंदी, संचारबंदी आणि त्यानंतर कठोर निर्बंध लागू असताना विविध ठिकाणचे रस्ते, पूल आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली.

रस्ते, पूल विभागांत खडखडाट; आपत्कालीन पायाभूत सुविधांचा निधी वळविण्याचा घाट

मुंबई : करोनामुळे टाळेबंदी, संचारबंदी आणि त्यानंतर कठोर निर्बंध लागू असताना विविध ठिकाणचे रस्ते, पूल आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. या कामांवर भरमसाट खर्च झाल्याचे समोर असून या तिन्ही विभागांसाठी चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली केवळ ११७.७६ कोटी रुपये रक्कम शिल्लक राहिली आहे. परिणामी, निधीअभावी या विभागांमध्ये खडखडाट झाला असून उर्वरित कामांचा खर्च भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन आपत्कालीन पायाभूत सुविधांसाठी प्रस्तावित केलेले ६०० कोटी रुपये या विभागांसाठी वळविण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे.

दरवर्षी पावसाळय़ात खड्डेमय होणारे रस्ते आणि पूल, तर मुसळधार पावसामुळे साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांच्या बळकटीकरणावर मोठय़ा प्रमाणावर निधीची गरज भासते. पालिका आयुक्तांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पामध्ये रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी १,१७८.१४ कोटी रुपये, पूल विभागासाठी ४४४.९३ कोटी रुपये, तर पर्जन्य जलवाहिन्या खात्यासाठी ५०५.१४ कोटी रुपये अशा एकूण २,१२८.२१ कोटी रुपयांची तरतूद केली होती. आगामी वर्षांतील कामांचा आढावा घेऊन हा निधी प्रस्तावित करण्यात आला होता.

मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि हळूहळू करोनाबाधितांची संख्या वाढत गेली. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आणि संपूर्ण कारभार ठप्प झाला. ती संधी साधून पालिकेने रस्ते आणि वाहतूक, पूल, तसेच पर्जन्य जलवाहिन्यांची कामे मोठय़ा प्रमाणावर हाती घेतली. सुरुवातीच्या काळात पालिकेला कामगारांचा तुटवडा भासला. परंतु परप्रांतीय माघारी परतू लागले आणि पालिकेला कामगारांची फौज उपलब्ध झाली. त्यामुळे या तिन्ही विभागांच्या कामांना वेग आला. या तिन्ही विभागांच्या विविध कामांसाठी अर्थसंकल्पीय तरतुदीतून १६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत अनुक्रमे १,१५२.७६ कोटी रुपये, ३७०.३३ कोटी रुपये आणि ४८७.३६ कोटी रुपये असे एकूण २,०१०.४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. आजघडीला या तिन्ही विभागांसाठी प्रस्तावित केलेल्या निधीपैकी अनुक्रमे २५.३८ कोटी रुपये, ७४.६० कोटी रुपये, तर १७.७८ कोटी रुपये असा एकूण ११७.७६ कोटी रुपये निधी शिल्लक राहिला आहे. या निधीमध्ये हाती घेतलेली कामे पूर्णत्वास नेणे अशक्य झाले आहे.

निधी अपुरा पडण्याची शक्यता

विविध ठिकाणच्या लहान, मोठय़ा रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा, मुंबईतील सखल भाग पूरमुक्त करण्यासाठी नाले वळविणे, रुंद करणे, खोली वाढविणे, पुनर्बाधणी, जतन, बदल, संरक्षक िभत, पर्जन्य जलवाहिनी प्रणालीत सुधारणा करणे आदी कामांसाठी निधी अपुरा पडण्याची शक्यता आहे. प्रस्तावित निधीपैकी अवघी ११७.७६ कोटी रुपयांची रक्कम शिल्लक राहिल्यामुळे लवकरच या तिन्ही खात्यांसाठी निधीची कमतरता भासण्याची शक्यता आहे.

६०० कोटींचा निधी वळवण्याची वेळ

 प्रशासनाने अर्थसंकल्पात अन्य कामांसाठी प्रस्तावित केलेला निधी वळविण्याचा निर्णय घेतला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने आपत्कालीन पायाभूत सुविधांसाठी तरतूद केलेल्या निधीपैकी ६०० कोटी रुपये या तिन्ही खात्यांच्या कामांसाठी वळविण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनाने स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Municipal corporation ysh

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या